दखल : काश्‍मीरमधील “ई-जिहाद’ संपवण्यासाठी…

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

अनेक वर्षे गुप्तहेर संस्था आपल्याला असे सांगत आहेत की, काश्‍मीरमध्ये 150-200 दहशतवादी आहेत. दरसाल सुरक्षादले 150-200 दहशतवादी ठारही करतच आहेत. पुढल्या वर्षी पुन्हा तेवढेच भरती केले जात आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांची संख्या ही कमी होत नाही.

27 ऑगस्टला जम्मू-काश्‍मीरच्या शोपियात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दोन आठवड्यांत या भागातील 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. फुटिरतावाद आणि दहशतवादाची सुपीक जमीन असलेल्या दक्षिण काश्‍मीरभर आपण प्रवास केला तर आपल्याला असे दृश्‍य दिसून येते की, काही तरुण आपापले स्मार्ट मोबाइल पाहतच माना झुकवून चालत असतात. जगभरातील तरुणांहून ते काही निराळे आहेत काय? खरे तर नाही. मात्र, जो मजकूर ते वाचत असतात तो निराळाच असतो. शुद्ध भेसळविरहित उग्रवादाचे किंवा देशद्रोहाचे विष.

खोऱ्यात गतीने उग्रवादीकरण सुरू

काश्‍मीर खोऱ्याचे भयंकर गतीने उग्रवादीकरण (रॅडिकलायझेशन) सुरू आहे.काश्‍मीरमधील काही स्मार्ट मोबाइलमध्ये धक्‍कादायक मजकूर असतो. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपल्यापाशी व्यूहरचना नाही. व्हॉट्‌सऍप गट केवळ दगडफेक करणाऱ्यांनाच संघटित करण्यासाठी उपयोगात आणले जात नसतात तर, ते सुरक्षा दलांच्या हालचालीबाबत दहशतवाद्यांना सावध करण्यासाठीही वापरले जात आहेत. आजूबाजूला तरुण पुरुष बोलत असतातच. जर त्यांनी एखादा लष्करी जत्था शिबिरांच्या दारातून बाहेर पडताना पाहिला तर, ती सूचना तत्काळ प्रक्षेपित केली जाते. वाहनांची संख्या, हालचालीची दिशा आणि सैनिकांची अदमासे संख्याही कळवली जाते. 

इंटर-सर्व्हिसेस-पब्लिक-रिलेशन्सचा ई-जिहाद

दुष्प्रचार करण्याकरता खोटी ट्‌विटर हॅंडल्स आणि फेसबुक पेजेस हजारांनी निर्मिली जातात. त्यांना पाकिस्तानच्या “आयएसआय’चा पाठिंबा असतो. ब्लॉग्ज, चलचित्रे आणि साहित्य हा एक संपूर्ण दुष्प्रचार उद्योगच निर्माण झालेला आहे. जो काही काश्‍मिरींच्या मनात विष पेरण्याचे काम करत आहे. उच्च दर्जाच्या व्यावसायिक मजकुराने तो चालवला जात आहे. पाकिस्तानी लष्करी दलांची एक शाखा असलेली इंटर-सर्व्हिसेस-पब्लिक-रिलेशन्स (आयएसपीआर) संस्था ई-जिहादची आईच आहे. त्यांनी निर्माण केलेले विषारी साहित्य काही तरुण काश्‍मिरींच्या स्मार्ट फोनांतून त्यांच्यापाशी पोहोचत आहे. मोठ्या प्रमाणावर त्यांचा बुद्धीभ्रंश केला जात आहे.

माहिती हे युद्धातील एक महत्त्वाचे अस्त्र म्हणून आपण मान्य केले पाहिजे. तसे ते आहेच. आपण काश्‍मीरमध्ये सामना करत असलेल्या बहुसंख्य समस्यांचे मूळ सामाजिक माध्यम आहे. पूर्वीच आपण त्याचा प्रतिकार केलेला असायला हवा होता. तो आपण केला नाही. तो करण्यासाठी सर्वात वरच्या स्तरात, दिल्लीत संपूर्णपणे सुरक्षित अशा एका इमारतीची निकडीची आवश्‍यकता आहे, जी लष्करी अधिकाऱ्यांकरवी कार्यरत केली जावी. आपण तिला माहिती युद्धाचे मुख्यालय म्हणूया. ह्या मुख्यालयाचे सर्वोच्च व्यवस्थापन अत्यंत सुटसुटीत असावे. त्याचबरोबर सामाजिक माध्यमतज्ज्ञ हवे आहेत. संशोधक, शास्त्रज्ञ हवे आहेत. इस्लामिक तत्त्ववेत्ते हवे आहेत. एकाच छताखाली हे सारे हवे.
आपल्याला आपल्याकरता काम करणारे काश्‍मिरी मुस्लीम स्त्री-पुरुषही हवे आहेत. हो, भारताची कथा सांगण्यास काश्‍मीरमध्ये हजारो लोक तयार आहेत. आपण त्यांना हाताशी धरले पाहिजे. हजारो ट्‌विटर हॅंडल्स, फेसबुक प्रोफाइल्स, इन्स्टाग्राम खाती, ब्लॉग्ज, संकेतस्थळे आणि व्हॉट्‌सऍप ग्रुप्स तयार करायला हवे आहेत. भारताच्या पक्षकर मजकूरनिर्मितीचे एक वादळच तयार करावे लागणार आहे. तेथे संवेदनशील आधुनिक अभ्यासक्रमांच्या शाळा सुरू कराव्या लागतील.

काय करावे

काश्‍मीरमध्ये प्रचूर असलेला वेडेपणा (भारत विरोध) मानसिक आजार आहे. तो सहजासहजी जाणार नाही. त्याच्या मुळावरच आघात करावा लागेल. त्याचे मूळ काही नागरिकांच्या मनात आहे. आपण फारच निष्काळजी आहोत कारण आपण हा वेडाचार काश्‍मीरमध्ये पसरू दिलेला आहे, आता मात्र तो संपला पाहिजे.

मंत्रालये आणि खाती माहितीयुद्ध चालवू शकत नाहीत. ते कुठल्याही गुप्तवार्ता संस्था चालवू शकत नाहीत. त्यांना ते समजून घेण्याची जाणच नसते. कोणतेही नियम पाळत नसलेल्या कुमार आणि युवा, प्रौढ व्यक्‍तींनी माहितीयुद्धाचे मुख्यालय लष्कराच्या देखरेखीखाली चालवावे. पुन्हा एकदा भारतीय लष्कराला पाचारण करण्याची वेळ आलेली आहे. फरक एवढाच आहे की, ह्यावेळी आता एके47 ऐवजी सैनिकी माहिती योद्ध्यांच्या हातात लॅपटॉप असेल.

लष्कराच्या विचार करण्याच्या मनोभूमिकेतच परिवर्तनाची गरज आहे. मात्र इतिहास साक्षी आहे की, भारतीय लष्कराहून, शिकून घेण्यास जास्त उत्सुक असा कोणताही विद्यार्थी आढळणार नाही. लष्करास ह्यात का गुंतवावे, तर भारतीय लष्कर ही एकच संस्था अशी आहे की, जेथे जमिनीवर तळापासून काम करणारे सैनिक आहेत, जे काम करवून घेऊ शकतात.

माहितीयुद्धाचे मुख्यालय ही भारतीय लष्कराची काश्‍मीरमधील निकडीची गरज आहे. लष्कराकडे शस्त्रास्त्रे, बुलेटप्रुफ जॅकेट्‌स आणि शिरस्त्राणे पुरेसे आहेत. पण विषारी कल्पनेला एके47 ठार करू शकत नाही. केवळ एक कल्पनाच कल्पनेला ठार करू शकते. जर आपण माहितीयुद्धाचे मुख्यालय निर्माण केले तर, यथावकाश दहशतवादी नाहीसे होतील आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा पराजय पत्करावा लागेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.