ऑनलाइन फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी ई-हक्‍क प्रणाली

नगर – ई हक्‍क ही प्रणाली ई फेरफार प्रणालीला पुरक असून त्यामधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये प्राप्त करुन घेवून फेरफारमध्ये रुपांतरित करता येणार आहेत. त्यासाठी ही प्रणाली ई-फेरफार प्रणालीशी संलग्न करण्यात आलेली आहे. यामुळे या प्रणालीच्या वापरामुळे तलाठी यांच्याकडील कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यास निश्‍चित मदत होणार आहे असे उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी सांगितले .

इंडिया भूमिअभिलेखाचे आधुनिकरण अंतर्गत सध्या राज्यात कार्यान्वित असलेल्या ई फेरफार प्रकल्पाच्या पूरक एक नविन प्रणाली जमाबंदी आयुक्‍त कार्यालयाच्या ई हक्‍क अज्ञावली नावाने विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्‍तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळया हक्‍काच्या नोंदी सातबारा वर फेरफारच्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाइन पध्दतीने दाखल करता येतील. यामध्ये सध्या पहिल्या टप्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील अशी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह बॅंका, सहकारी सोसायटया , पतसंस्था यांना देखली वापरता येईल.

सध्या पहिल्या टप्यात वारस नोंद, बोजा / गहाणखत दाखल करणे, बोजा कमी करणे, ई करार नोंदी, मयताचे नांव कमी करणे, अज्ञानपालन कर्ताचे नाव (अपाक) कमी करणे, एकत्र कुटूंब पुढारी/ मॅनेजर (एकुम्या) कमी करणे व विश्‍वस्थांचे नाव बदलणे अशा आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाइन पध्दतीने दाखल करता येतील. वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे यासाठीचे अर्ज बॅक / वित्तीय संस्था आणि ई करारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी कयाना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाइन पध्दतीने दाखल करता येतील.

अर्ज कोण करु शकतात
त्यासाठी बॅंक प्रतिनिधी, सोसायटी सचिव व खातेदार यांना संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व त्यासाठी आपले पूर्ण नाव , पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल आयडी, पॅनकार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे. आपला युजर आयडी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल. तयार केलेला युजरआयडी व पासवर्ड जतन करुन ठेवावा लागेल व तो प्रत्येक वेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल. कोणत्याही व्यक्‍तीने ऑनलाइन अर्ज दाखल करताच त्याला या ऑनलाइन अर्जाच्या प्रतीसी पोहोच त्याच्या अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह मिळेल. त्याचे आधारे अर्जदार संस्था/ व्यक्‍तीला आपल्या अर्जाची स्थिती याच संकेतस्थळावर आपल्या लॉगीनने केव्हाही पहाता येईल.
अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहे त्याची यादी प्रणालीमध्ये देण्यात आलेली असून ही कागदपत्रे स्कॅन करुन (स्वयंसांक्षाकित प्रत) अर्जासोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्‍यक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)