साताऱ्यात ई-चलनाचा दणका 

सातारा  – शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहनांना दंड करणारी पारंपारिक पावती पुस्तके (जीएम) बंद झाल्यानंतर शनिवारपासून बेशिस्त वाहनधारकांना जागेवरच दंड करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेला व जिल्हा वाहतूक शाखेला 49 ई- चलन मशिन मिळाली आहेत. त्यानंतर सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या मशिनद्वारे साताऱ्यातील राधिका चौकात गुरूवारी एका चारचाकी वाहनधारकाकडून पहिल्यांदाच तब्बल सहा हजाराचा दंड वसूल केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरासह जिल्ह्यातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी व पोलीस कर्मचाऱ्यांवर चिरीमिरीचे होणारे आरोप बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दि.1 जुन पासून ई-चलन या प्रणालीचा वापर सुरू केला. त्यासाठी वाहतूक पोलीसांनाही मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलीसांनी कारवाईचा धडाका लावला. मात्र, गुरूवारी दुपारी राधिका चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस नाईक मनोज मदने व विशाल मोरे यांना चारचाकी (क्रं एमएच 01 सीआर 2472) व्हॅगनआरच्या चालकाने सिट बेल्ट लावला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्या चारचाकीला थांबवून त्याच्या चालकाला सिट बेल्ट लावला नसल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर चालकाला दोनशे रुपयाचा दंड भरण्यास सांगितले.

चालक दंड भरण्यास तयार झाल्यानंतर ई-चलन करण्यासाठी चारचाकीचा नंबर मशिनमध्ये अपलोड केल्यानंतर त्या चारचाकीने यापुर्वी मुबंईतही वाहतूक नियमाचे पालन न केल्याने त्याला वेळोवेळी पाच हजार आठशे रुपयांचा दंड झाल्याचे दिसून आले. त्यावर पोलीसांनी पुर्वीचा व अत्ताचा दंड असे एकूण सहा हजार रुपये संबंधिताकडून भरून घेतले. ई-चलन आल्यानंतरची साताऱ्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.