दहा बसचे उत्पन्न दिवसाला 80 ते 85 हजार
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव, चिंचवड, आकुर्डी या परिसरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद या बसना मिळत आहे. गेल्या महिन्याभरात निगडी आगारातून धावणाऱ्या दहा बसमागे दर दिवशी सुमारे 80 ते 85 हजार महसूल प्राप्त होत आहे. तसेच, ई-बस सुरू केल्यापासून उत्पन्नात दिवसेंदिवस वाढ होत आहे, असा दावा प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.
पिंपरी – गेल्या दीड महिन्यांपूर्वी पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-बसला प्रवाशांचा पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या ई-बसमुळे पीएमपीच्या खर्चात कपात झाली असून उत्पन्नातही भर पडली आहे. सद्यस्थितीत निगडी आगारातून सुटणाऱ्या 10 बस असून प्रत्येक बसमागे “पीएमपी’ला दिवसाचे उत्पन्न आठ ते नऊ हजार मिळत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर ई-बस या वातानुकूलित असल्याने प्रवाशी या बसेसना प्राधान्य देत आहेत. सध्या पुण्यामध्ये बस पार्किंगचा अभाव असल्याने ई-बसची सर्व वाहने निगडी आगारात ठेवली जातात. या ठिकाणी सहा चार्जिंग स्टेशनवर बस चार्जिंग होतात. तीन ते चार तासांच्या चार्जिंगसाठी पीएमपीला प्रति युनिट आठ रुपये खर्च येत आहे. बस चार्जिंग झाल्यानंतर सुमारे 200 ते 225 किलोमीटर धावत आहे. सध्या शहरातील आकुर्डी ते मनपा आणि हिंजवडीच्या विविध मार्गावरील बसला प्रतिसाद वाढत आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड शहराला दहा ई-बस देण्यात आल्या आहेत. या सर्वच बसेस मार्गावर धावत असल्याने निगडी आगाराच्या उत्पन्नात भर पडत आहे.
ई-बसला नागरिकांचा प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. बस सुरू झाल्यापासून उत्पन्नातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. या बसमुळे प्रदूषण कमी होत असल्याने ई-बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
संतोष गव्हाणे, आगार प्रमुख, निगडी