सामान्य बसच्या तुलनेत ब्रेकडाऊनचे प्रमाणही अत्यल्प
प्रतिकिलोमीटर 25 टक्के अधिक उत्पन्न
सीएनजी बसला प्रतिकि.मी. 90 रु. खर्च
ई-बसला 74 रुपयेच येतो खर्च
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या सीएनजीवर चालणाऱ्या बसपेक्षा ई-बसला प्रतिकिलोमीटर 25 टक्के अधिक उत्पन्न मिळत आहे. तर संचलनातील सीएनजी बसचा प्रतिकिलोमीटर 90 रुपये खर्च पीएमपी प्रशासनाला करावा लागतो. त्यातुलनेत ई-बसला 74 रुपये खर्च पडतो. त्यामुळे येत्या काळात या बसेसचा अधिक फायदा होणार आहे.
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन ऍन्ड डेव्हलपमेंट पॉलिसी या (आयटीडीपी) संस्थेच्या “अर्बन मोबलिटी ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेस’ या उपक्रमांतर्गत पीएमपीच्या ताफ्यातील पारंपरिक बस आणि नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित ई-बसच्या कामगिरीचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. त्याचा अहवाल नुकताच सादर करण्यात आला. “आयटीडीपी’च्या श्रेया गडेपल्ली आणि अनुज ढोले यांनी हा अहवाल तयार केला आहे.
साध्या बसच्या तुलनेत ई-बसचे प्रवासी 23 टक्के अधिक आहेत. यासह ई-बससाठी दर किलोमीटरला 8 रुपयांची वीज खर्च होते. तर, तोच खर्च सीएनजीसाठी 18 ते 20 रुपये येतो. अर्थातच, ई-बसमुळे इंधनाचा खर्च 60 टक्क्यांनी घटला आहे. सामान्य बसच्या तुलनेत ई-बसचे ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे ई-बसच्या एकूण ताफ्याच्या तुलनेत 98 टक्के बसचा दैनंदिन संचलनात उपयोग होते. त्यातुलनेत पीएमपीच्या दैनंदिन कार्यान्वित असणाऱ्या बसची संख्या सरासरी 75 टक्के असून, दररोज 15 टक्के फेऱ्या विविध कारणांमुळे रद्द कराव्या लागतात. त्यामुळे तोट्यात वाढ होते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि समस्यांवर मात करण्याबाबत वातानुकूलित ई-बसच्या रुपाने आशेचा किरण प्राप्त झाला आहे.
सध्या पीएमपीच्या भेकराईनगर आणि निगडी डेपो येथे दोन चार्जिंग स्टेशन आहेत. त्या ठिकाणी अनुक्रमे 52 आणि 30 चार्जिंग पॉइंट्स आहेत. येत्या काळात ई-बस सेवेचा विस्तार करण्यासाठी 7 नवीन चार्जिंग स्टेशन प्रस्तावित असून, त्या ठिकाणी 345 चार्जिंग पॉइंट्स असणार आहेत.