एसटी आणि पीएमपीचे संयुक्त संचलन : भाडेही भरावे लागणार
पुणे – एसटी बसचे संचलन शहराबाहेरून व्हावे, यासाठी देण्यात आलेली बाणेर येथील स.नं. 111 मधील 14 हजार चौरस मीटर जागा पीएमपीच्या ई-बस डेपोसाठी दिली जाणार आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या ई-बससाठी येथे डेपो उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमपीने या जागेची मागणी केली होती. मात्र, ही जागा एसटीला दिल्याने पालिकेने त्यास नकार दिला होता. मात्र, एसटीने काही अटींवर ही जागा देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे ही जागा पीएमपीला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भेकराईनगर, निगडीपाठोपाठ आता बाणेर येथेही ई-बस डेपो विकसित होणार आहे.
ही जागा एसटीसाठी आरक्षित असली, तरी अद्याप एसटीकडून त्यासाठी मागणी करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, त्याच वेळी पीएमपीने ही जागा मागणी केली. त्यामुळे पालिकेने एसटीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना पीएमपीला केल्या होत्या. हे प्रमाणपत्र देताना एसटी नियंत्रण कक्ष, प्रवाशांसाठी बस शेड तसेच एसटीच्या जागा पार्किंग करण्यास मुभा देण्याच्या अटींवर ही जागा पीएमपीला देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, मासिक साडेसात हजार रुपयांचे शुल्क आकारून ही जागा पीएमपीला देण्यात आली आहे.