‘ई-बस’ चार्जिंगची समस्या सुटली

निगडी आगारात नवीन चार्जिंग स्टेशन : “ई-बस’चे चार मार्ग वाढले

पिंपरी – पीएमपीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी नवीन आलेल्या ई-बसेसला मोठा दिलासा मिळाला आहे. निगडी येथील पीएमपीच्या ई-बससाठी असलेल्या स्वतंत्र आगारात ई-बस चार्जिंग युनिटच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे ई-बसला कमी पडणाऱ्या इंधनाचा प्रश्‍न मिटला आहे. यामुळे निगडी आगारातून ई-बसेसचे चार नवीन मार्ग सुरु करण्यात आले आहे. याचा फायदा प्रवाशांना होत आहे.

याआधी आगारात केवळ सहा चार्जिंग स्टेशन असल्याने ई-बसेसना पूर्ण चार्जिंग करण्यासाठी अडचणी येत होत्या यामुळे काही बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या मात्र, नवीन चार्जिंग स्टेशनमुळे हा प्रश्‍न सुटणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे परिवहन महामंडळाच्या वतीने (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वाहतूक सेवा गतिमान व सुरक्षित करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ई-बसेस व सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहे. ई-बससाठी निगडीतील जुने पीएपमीचे आगार देण्यात आले आहे. सध्या निगडी आगारात 27 चार्जिंग युनिट बसविण्यात आले आहे . तर, येत्या काही दिवसात येथे पूर्ण 43 चार्जिंग स्टेशन बसविण्यात येणार आहेत. त्याचे काम टप्प्याटप्याने हातात घेतले आहे. याआधी आगारात फक्‍त 6 स्टेशन होते. यामुळे मोठी अडचण येत होती. मात्र, आता नवीन स्टेशनच्या निर्मितीमुळे ई-बसचा वेळ वाचणार आहे. याचा थेट परिणाम पीएमपीच्या तिजोरीवर होणार असून महसूलात वाढ होणार आहे.

यापूर्वी अपुऱ्या चार्जिंग स्टेशनमुळे ई-बसेसला चार्जिंग करण्यासाठी कसरत करावी लागत होती. ई-बसेसच्या फेऱ्या कधी कमी व कधी रद्द कराव्या लागत होत्या. निगडी आगारातून सध्या 25 ई-बसचे संचलन सुरु आहे. यापूर्वी दोन मार्गावर या बसेस धावत होत्या मात्र, आता चार्जिंगची मुबलक रसद मिळाल्याने चार अतिरिक्त मार्गावर बसेस धावणार आहेत. त्यात निगडी ते शेवाळवाडी, निगडी ते भेकाराईनगर आणि निगडी ते कात्रज या मार्गावर अतिरिक्‍त संचलन सुरु करण्यात येणार आहे, पुण्यातील भेकराईनगर आणि निगडी दरम्यान 83 ई-बसचे संचलन सुरु आहे. आत्तापर्यंत ह्या बसेसनी 21 लाख किलोमीटरचे संचलन केले आहे.

येत्या आठ दिवसात 27 नवीन चार्जिंग स्टेशन आगारात बसविण्यात येणार आहेत. यामुळे ई-बसचा फेऱ्यात वाढ होत असून, प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत एकाही बसची ब्रेकडाऊनची तक्रार नसून ई-बस चालकांची वेळोवेळी ट्रेनिंग सुरु आहे. ट्रेनिंग घेतलेलेच चालक ई-बसचे संचलन करणार आहेत.
– किरण बोराडे, व्यवस्थापक ई-बस, निगडी आगार

Leave A Reply

Your email address will not be published.