लॉकडाऊन दरम्यान पसंती; नवी वाचन संस्कृती रुळतेय
पिंपरी – करोनाची भीती, जाहीर झालेला लॉकडाऊन आणि सुरू असलेली संचारबंदी यामुळे नागरिकांना घरामध्येच अडकून राहण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या वेळेचा वापर आता नागरिक ई-पुस्तके वाचण्यासाठी करू लागली आहेत. इतर गोष्टींबरोबरच विरंगुळ्याचे साधन म्हणून वाचन सुरू झाल्याचे पहावयास मिळत असून, लॉकडाऊनच्या काळात का होईना वाचन संस्कृती बाळसे धरू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे.
21 मार्चपासून राज्यात आणि देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. सुरुवातीच्या काळात येन-केन मार्गे दिवस घालविणाऱ्या नागरिकांना दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वेळ काढणे मुश्कील बनले आहे. 3 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहणार असल्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण आपल्या पद्धतीने विरंगुळ्याचे साधन शोधत आहे.
काहीजण आपल्याजवळ असलेली परंपरागत पुस्तके वाचून वेळ घालवित आहेत. तर तरुण पिढी मात्र ई-पुस्तके वाचण्यावर भर देऊ लागली आहे. ऑनलाइन असलेल्या पुस्तकांची मागणी वाढली आहे. पुस्तके घरपोहोच मिळत नसल्याने ऑनलाइन साईटवर उपलब्ध असलेली पुस्तके वाचण्यावर भर देत आहेत.
जुन्या कथा, कादंबऱ्यांपासून सध्या उपलब्ध असलेली अनेक विरंगुळ्याची पुस्तके वाचण्यावर या वाचकांचा भर आहे. याशिवाय एकमेकांकडे उपलब्ध असलेल्या ई-पुस्तकांच्या पीडीएफ फाईलचीही देवाणघेवाण सुरू झाली आहे. वाचनाबरोबरच ऑनलाइन साईटवरील ऑडिओ बुक्सवरही भर दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तरुण पिढी पुन्हा एकदा वाचनसंकृतीला आपलेस करत असल्याचे दिसून येत आहे. तर वाचनाची संस्कृती आणि रुपही बदलत असल्याचे पहावयास मिळत आहे.