पुणे – जमीन, दुकाने किंवा सदनिका यांची झालेली खरेदी विक्रीचे व्यवहारांचे दस्त नोंदणी विभागाने “ई-सर्च’ या प्रणालीद्वारे ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता याच धर्तीवर भूमिअभिलेख विभाग ई-सर्च प्रणालीचा स्वीकार केला आहे. ई-अभिलेख सुरू केले असून यामध्ये नागरिकांना जुने 7/12 उतारे, फेरफार, जमिनीचे नकाशे आदी प्रकारचे दस्ताऐवज घरबसल्या मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत ई-फेरफार हा प्रकल्प राज्यात सुरू आहे. यासाठीची संगणक प्रणालीही “एनआयसी’ यांच्याकडून तयार केली आहे. आता ई-अभिलेख या प्रकल्पाकरिता नोंदणी विभागची ई-सर्च ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनआयसीला नियुक्त केले आहे. “एनआयसी’ या प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्य करणार आहे. ई अभिलेखसाठी एनआयसीला मनुष्यबळासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्यानुसार शासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत मार्गी लागणार आहे.
23 कोटी अभिलेखांचे स्कॅनिंग
भूमि अभिलेख विभागही आता कात टाकत असून सर्व सातबारे उतारे, फेरफार, जमिनीचे नकाशे आदी प्रकारच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे. राज्यातील 23 कोटी अभिलेखांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग 8 जिल्ह्यांमध्ये सुरू केला आहे. भूमि अभिलेख विभाग ई-सर्च प्रणालीवर जुने सातबारे- फेरफार, मोजणीचे नकाशे, सिटी सर्व्हे नकाशे आदीप्रकारचे अभिलेख ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या जमिनी विषयीचे अभिलेख पाहता येणार आहे. त्याचबरोबर त्याची प्रिंटही काढता येणार आहे.