ज्ञानदीप लावू जगी | हा तो त्याग तरुवरु

हा तो त्याग तरुवरु। जो गा मोक्षफळें ये थोरु। सात्विक ऐसा डगरु। यासींच जगीं ।।207।। लोह लागतखेंवो परीसीं। धातूची गंधिकाळिमा जैसी। जाती रजतमें तैसीं। तुटलीं दोन्ही ।।209।। मग सत्वें चोखाळें। उघडती आत्मबोधाचे डोळे। तेथ मृगांबु सांजवेळे। होय जैसें ।।210।। तैसा बुद्‌ध्यादिकांपुढां। असतु विश्‍वाभासु हा येवढा। तो न देखे कवणीकडां। आकाश जैसें ।।211।। (अध्याय 18)

हा त्यागरूप वृक्ष सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ असून, यालाच मोक्षरूप मोठाली फळे येतात, म्हणून सर्व जगात हा सात्त्विक त्याग अशी प्रसिद्धी आहे. ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श होताक्षणीच लोखंड बदलते त्याप्रमाणे कर्मकर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची इच्छा यांचा त्याग केल्यावर रज व तम हे दोन्ही त्याग नाहीसे होतात.

मग शुद्ध सत्त्वाने आत्मबोधाचा उजेड होतो. जसे संध्याकाळी मृगजळ आपोआप नाहीसे होते किंवा आकाश (पोकळी) जसे कोणीकडे दिसत नाही, तसा ज्ञानाच्या पुढे जगाचा मोठा मिथ्या भास दिसत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.