बीड – बीडमधील द्वारकादास मंत्री बॅंकेमध्ये 229 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने फेब्रुवारी 2021 मध्ये द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बॅंकेच्या आंतरशाखीय समायोजन व्यवहाराची विशेष तपासणी केली होती. यात बॅंकेतील नियमांचे उल्लंघन झाल्याने दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठीचा अहवाल सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने सहकार आयुक्तांनी बॅंकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुभाष सारडा यांचे पुत्र आदित्य सारडा हे पंकजा मुंडे यांचा निकटवर्ती आहेत. आदित्य सारडा हे बीड जिल्हा बॅंकेचे पाच वर्षे अध्यक्ष होते. बॅंकेमध्ये झालेला गैरव्यवहार प्रशासकांच्या लक्षात आल्यानंतर प्रशासक मंडळाचे सदस्य बीबी चाळक यांच्या फिर्यादीवरून 229 कोटी 5 लाख रुपयाचा अपहार झाल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुभाष सारडा यांच्यासह 25 जणांवर आता या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.