भिवंडी : राज्यात पावसाळ्याच्या तोंडावर अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे सुरु आहेत. या कामाची पाहणी देखील करण्यात येत आहे. नेहमी अधिकारी, लोकप्रतिनिधी नाल्याच्या कडेला उभं राहून कामाची पाहणी करताना आपण नेहमीच पाहतो. पण भिवंडीत नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा आणि कौतुकही सुरु आहे.
भिवंडीत पाणी वाहून नेण्यासाठी भलामोठा नाला या ठिकाणाहून आरिफ गार्डन इथून पुढे जातो. इथल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी स्थानिक वार्ड क्रमांक दोनच्या आरोग्य निरीक्षक सुविधा सुभाष चव्हाण यांच्यावर आहे.
नाल्याच्या सफाई कामावर प्रत्यक्ष हजर राहून देखरेख करत असताना नक्की काम किती झाले हे पाहण्यासाठी, सुविधा चव्हाण या थेट मॅनहोलमधून भल्यामोठ्या नाल्यात उतरल्या. किती काम झाले, नक्की काय काम झाले हे पाहण्यासाठी एक महिला अधिकारी आपला पदर कंबरेला खोचून नाल्यात उतरली याचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.
आयुक्तांनी नुकतीच माझी नियुक्ती प्रभारी आरोग्य निरीक्षक पदावर केली आहे. आपलं काम प्रामाणिकपणे करावंच, पण ते आपले कर्तव्य आहे या भावनेतून मी काम केले. त्यासाठीच मी नाल्यात उतरले, अशी प्रतिक्रिया सुविधा सुभाष चव्हाण यांनी दिली.