मुंबई – मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेना आणि सचिव अनिल देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.
याचिकेत म्हटले आहे की मुंबई महापालिकेने आम्ही केलेल्या मागणी अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नाहीं त्यामुळे आम्हाला कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागत आहे. शिवाजी पार्कवर सेनेच्या दसरा मेळाव्याला तत्काळ परवानगी देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महापालिकेला द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सेनेने अॅडव्होकेट जोएल कार्लोस यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, पक्ष 1966 पासून शिवाजी पार्कवर दरवर्षी दसरा मेळावा घेत आहे आणि महापालिकेने त्याला नेहमीच परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले आहे. राज्य सरकारच्या प्रभावामुळे महापालिकेने शिवाजी पार्कच्या जागेविषयी अजून निर्णय घेतलेला नाही.
शिवसेनेच्या शिंदे गटानेही शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा अट्टहास केला होता. पण त्यांना बीकेसीची जागा देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र शिवसेनाला शिवाजी पार्कसाठी अनुमती दिली गेलेली नाही.