अभिभाषणावेळी विरोधकांनी हातांना बांधल्या काळ्या फिती

का, एनपीआर आणि एनआरसीचा संसदेत निषेध

नवी दिल्ली -संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी कॉंग्रेससह 14 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हातांना काळ्या फिती बांधल्या. नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तक (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकाचा (एनआरसी) निधेष करण्यासाठी विरोधकांनी ती कृती केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अभिभाषण झाले. त्यावेळी विरोधी पक्षांचे सदस्य एकत्र बसले. पहिल्या रांगेतील आसने सोडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि लोकसभेतील कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांनीही सहकाऱ्यांसमवेत बसणे पसंत केले. राष्ट्रपतींनी वादग्रस्त कायद्याची प्रशंसा करताच विरोधकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. हातांना काळ्या फिती बांधणाऱ्या विरोधकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, सप, द्रमुक, राजद, माकप, भाकप, झामुमो, जेडीएस, आरएसपी, केरळ कॉंग्रेस(एम), आययुएमएल आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांचा समावेश होता.

त्याआधी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनाच्या आवारात निदर्शने केली. राज्यघटना वाचवा, या घोषणेचे फलक निदर्शनांवेळी झळकावण्यात आले. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तसेच, का-एनपीआर-एनआरसीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. त्या निदर्शनांमध्ये राहुल गांधीही सहभागी झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.