पाणीकपातीच्या काळात अवघ्या 641 अनधिकृत नळजोडांवर कारवाई

अडीच हजार नळजोड केले नियमित

पिंपरी – समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने शहरावर दिवसाआड पाणीकपात लादली होती. आता ही कपात कायम ठेवण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये पाणीकपात लादताना आवश्‍यक उपाययोजनांसाठी केवळ दोन महिने कपात करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु या दोन महिन्यांमध्ये अवघ्या 641 अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात आली.

या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये 641 अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत नळजोडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एक वर्षामध्ये 16 हजार 602 अनधिकृत नळजोडणी आढळून आली होती. दोन महिन्याच्या कालावधीमध्ये “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 5 नळजोडांवर कारवाई केली. तर 99 नळजोड नियमित करण्यात आले. संपूर्ण शहरामध्ये दोन महिन्यामध्ये 2 हजार 576 नळजोड नियमित केले आहेत.

शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ कनेक्‍शन घेण्यात आले आहे. जलवाहिनीमधून घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी परवानगी न घेता कनेक्‍शन घेतले जाते. त्यामुळे महापालिकेला मिळणारा महसूल बुडविला जातो. तसेच या जोडणींमधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याने पाण्याची नासाडी होते. त्यामुळे शहरामध्ये पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करता येत नसल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे या अनधिकृत नळजोडांवर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने कारवाई केली जात आहे.

दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून यापुढेही अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्‍शन घेतले आहे. त्यांनी महापालिकेत अर्ज करून कनेक्‍शन नियमित करून घेण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी केले.

बांधकामांना पाणी कुठून येते
शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात नाही. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही अनेकवेळा कोलमडते. मात्र शहरातील बांधकामांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. शहरामध्ये पाणीटंचाई आहे तर बांधकामासाठी कूठून पाणी येते असा सवाल नागरिक करत आहेत. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅंकर सुरू आहेत. सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच ही टॅंकर लॉबी सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.