सध्या लॉकडाउनमुळे अभिनेता सलमान खान पनवेल येथील फार्महाउसवर अडकला आहे. त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता, आयुष शर्मा, भाचा आहिल, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लूलिया वंतूर देखील आहे. तर सलमान खानची आई सलमा खान आणि वडील सलीम खान हे मात्र फार्महाऊसवर गेलेले नाहीत. ते सध्या वांद्रे येथील घरीच आहेत. पण सध्या सलमान फार्महाऊसवर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
सलमानने त्याच्या मित्रमंडळींसोबत लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा वापर करत काही गाणी बनवून, गाऊन, शूट करून रिलीज करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यापैकी हे एक गाणं तेरे बिना! आज ट्वीटरवर सलमान खानने हे गाणं लॉन्च करताना त्याच्या चाहत्यांनाही घरच्या घरी हे गाणं रिक्रिएट करून त्याला टॅग करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, तेरे बिना गाण्याच्या रोमॅन्टिक व्हीडिओमध्ये सलमान सोबत केवळ जॅकलिन फर्नांडीसची झलक पहायला मिळते. यामध्ये दोघांची घोडेस्वारी, बाईक राईड, स्विमिंग पूलमधील डूबकी ते अगदी मावळत्या सूर्याच्या साक्षीने घट्ट मिठी अशा वेगावेगळ्या मूडसची झलक पहायला मिळते. तेरे बिना हे गाणं सलमान खानने स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केले आहे.