Lockdown च्या काळात अंबानी झाले प्रचंड ‘श्रीमंत’; 1 तासाच्या कमाईच्या बरोबरीसाठी कामगाराला 10 हजार वर्ष करावं लागेल काम

नवी दिल्ली – भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या शंभर लोकांची श्रीमंती लॉक डाऊनच्या आणखीच वाढली आहे. या 100 श्रीमंताची संपत्ती लॉकडाऊनच्या काळात 12,97,822 कोटी रुपयांनी वाढली आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की यातून भारतातील 14 कोटी गरिबांना प्रत्येकी 94 हजार रुपये दिले जाऊ शकतात.

भारतातील समृद्धी निर्मिती आणि वितरण हा संबंधातील अहवाल ऑक्‍सफॅम या संस्थेने जाहीर केला आहे. करोना व्हायरसमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भेद अधिकच वाढला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांनी जास्तच संपत्ती मिळविली आहे.

अंबानी यांनी या काळामध्ये मिळविलेली एक तासाची संपत्ती मिळवण्यासाठी एका कामगाराला 10 हजार वर्ष काम करावे लागेल. या काळात अंबानी एका सेकंदात जेवढी संपत्ती मिळविले आहे तेवढी संपत्ती मिळवण्यासाठी एका कामगाराला तीन वर्ष काम करावे लागेल.

जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक उद्या सुरू होत आहे. या बैठकीमध्ये जागतिक आर्थिक व्यवस्थेबाबत आणि आर्थिक असमानतेबाबत विचार केला जातो. त्या अनुषंगाने आज जाहीर करण्यात आलेल्या या अहवालातील माहितीला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. व्हायरसमुळे जागतिक पातळीवर 100 वर्षात पहिल्यांदाच आरोग्यविषयक गंभीर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

त्यामुळे अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाल्या. गरीब देशांचे अतोनात नुकसान झाले. 1930च्या महामंदीनंतर जागतिक पातळीवर असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. भारतात या काळात श्रीमंत लोकांची संपत्ती बेफाम वाढली. तर गरीब लोक प्रचंड अडचणीत आले. जागतिक पातळीवरही गरीब आणि श्रीमंतातील असमानता वाढली. याची गंभीर दखल घेऊन विविध सरकारनी आणि अर्थतज्ज्ञांनी ही तफावत दूर करण्यासाठी काही विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.

भारत स्वतःला वेगाने विकसित होणारा देश असे संबोधत असला तरी भारताच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेवर किरकोळ खर्च केला जातो. या क्षेत्रात भारत बुडातील चौथा देश आहे. जर भारतातील सर्वात श्रीमंत 11 लोकावर एक टक्के कर लावला राजगार हमी याजना किंवा आरोग्य विभागाचे योगदान 140 पटींनी वाढू शकते.

करोनानंतर भारताने जगात सर्वात कडक लॉकडाऊन प्रदीर्घकाळ लागू केले होते. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. बेकारी वाढली आणि लोक भुकेच्या तडाख्यात अडकले. लाखो लोकांना उन्हात प्रवास करावा लागला. मात्र या काळात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक माहिती तंत्रज्ञान आणि फोनचा वापर करून आरामात राहिले. त्यांच्या जीवनशैलीवर फारसा फरक पडला नाही.

लॉकडाउनच्या काळामध्ये त्यांच्या संपत्तीत बेसुमार वाढ झाली त्यामध्ये मुकेश अंबानी यांच्याशिवाय गौतम अंबानी, शिव नादर, सायरस पूनावाला, उदय कोटक, अजीम प्रेमजी, सुनील मित्तल, राधाकृष्ण दमानी, कुमारमंगलम बिर्ला, लक्ष्मी मित्तल यांचा समावेश आहे. एकीकडे एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक तासाला 1 लाख 70 हजार लोक रोजगार गमावत असताना दुसरीकडे श्रीमंताच्या श्रीमंतीत मात्र वाढ होत गेली.

मुकेश अंबानी यांनी लॉक डाऊनच्या काळात जेवढी संपत्ती कमावली तेवढ्या संपत्तीचा उपयोग केला तर 40 कोटी लोकांना किमान पाच महिने दारिद्रयरेषेच्या बाहेर काढता येऊ शकेल. भारतातील श्रीमंताच्या संपत्तीत 2009 पासून 2020 पर्यंत 90 टक्के वाढ झाली होती. मात्र 2020 च्या मार्च महिन्यापासून डिसेंबरपर्यंत श्रीमंताच्या संपत्ती तब्बल 35 टक्के इतकी वाढ झाली आहे. 12.2 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला त्यातील 75 टक्के म्हणजे 9.2 टक्के लोक अनौपचारिक क्षेत्रातील आहेत.

रोजगार गमावलेल्या लोकांना आपल्या शहरात परत जाताना त्रास झाला. त्यामध्ये 300 लोक मृत्युमुखी पडले. या काळात महिलांच्या रोजगारावर सर्वाधिक परिणाम झाला मात्र त्याबद्दल अजूनही फारसे बोलत नाही. असमानतेचे हे प्रश्न सोडवले नाही तर याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असे ऑक्‍सफॅम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहार यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.