“ऐन करोना काळात आम्ही सुरक्षित आणि यशस्वी निवडणूक प्रक्रिया राबवली”

सर्वांकडून कौतुक झाल्याचा मुख्य निवडणूक आयुक्तांचा दावा

नवी दिल्ली – करोनाच्या काळात बिहार मध्ये विधानसभेची निवडणूक घेणे किंवा पोटनिवडणुका घेणे हा मुर्खपणा असल्याचे काही जण म्हणत होते पण आम्ही या निवडणूका सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे घेऊ शकलो आहोत.

ही लोकशाहीची प्रक्रिया आणि जबाबदारी ऐन करोना काळात आम्ही उत्तम प्रकारे राबवली याबद्दल अनेकांनी आमचे कौतुक केले आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल आरोरा यांनी म्हटले आहे.

या पार्श्‍वभूमीवर आम्ही पुढील काळातील विधानसभांच्या निवडणुकाही वेळेवर घेऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. येत्या मे जून या काळात तामिळनाडु, पश्‍चिम बंगाल, आसाम, पदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत.

ते म्हणाले की बिहार मध्ये करोना काळात विधानसभांच्या निवडणूका घेणे, म्हणजे दु:साहस असल्याची टिपण्णी आमच्यावर केली गेली होती. पण आम्ही अत्यंत नियोजनपुर्वक व अपार श्रम घेऊन हे काम यशस्वीपणे पुर्ण केले आहे असे ते म्हणाले.

आमच्यासाठी हे एक आव्हानात्मक काम होते पण आम्ही ते यशस्वीपणे पार पाडले असे अरोरा यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले. आम्ही तेथे केलेल्या या कार्याचे सर्व संबंधीत राजकीय पक्ष, सामान्य मतदार आणि माध्यमांनी योग्य ते मुल्यमापन करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पोस्टल मतपत्रिकांच्या संबंधात विरोधकांनी जे आरोप केले आहेत त्यावर त्यांनी यावेळी अधिक भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले बिहार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या विषयावर तपशीलवार भाष्य केले आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.