“जी-20’परिषदेदरम्यान मोदी करणार 10 द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली – जपानमधील “जी-20′ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या 10 द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यामध्ये फ्रान्स, जपान, इंडोनेशिया, अमेरिका आणि तुर्कीबरोबरच्या द्विपक्षीय चर्चेचा समावेश आहे. याशिवाय भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण अफ्रिकेचा समावेश असलेल्या “ब्रिक्‍स’ देशांच्या नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत.

जपानमध्ये ओसाका येथे 28 आणि 29 जून रोजी होणाऱ्य “जी-20′ परिषदेसाठी पंतप्रधान जाणार आहेत. या परिषदेमध्ये उर्जा सुरक्षा, दहशतवादाला विरोध आणि आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण आदी विषय ते या परिषदेमध्ये उपस्थित करण्याची शक्‍यता आहे. यावेळच्या परिषदेसाठी “मानव केंद्रीत भविष्यातील समाज’ असे ब्रीदवाक्‍य आहे. याच्याशीच संबंधित एक जाहीरनामाही या परिषदेदरम्यान प्रसिद्ध केला जाणार आहे.

भारतासाठी उर्जा सुरक्षा, वित्तीय स्थिरता, आपत्तीकेंद्री लवचिक पायाभूत सुविधा, बहुपक्षवादातील सुधारणा, जागतिक व्यापार संघटनेतील सुधारणा, दहशतवादाला विरोध, आर्थिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण, अन्न सुरक्षा, तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण आणि सामाजिक सुरक्षेसाठीच्या छोट्या योजना आदी विषय भारताच्यादृष्टीने महत्वाच्या आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

या परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांमध्ये व्यापार आणि आर्थिक प्रगती, जागतिक अर्थकारण, वित्तीय आणि डिजीटल अर्थकारण, कृत्रिम बुद्धीमत्ता, सर्वसमवेशक आणि स्थायी विश्‍वासंदर्भात चर्चा करतील. या परिषदेमध्ये भारतव्यतिरिक्‍त अमेरिका, ब्रिटन, युरोपिय संघ, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, रशिया, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्‍सिको, कोरिया, दक्षिण आफ्रिका, रशिया, सौदी अरेबिया आणि तुर्की आदी देश सहभागी होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.