ऐन दुष्काळात बोअरवेलने भागवली वाठारकरांची तहान

वाठार स्टेशनच्या लोकांची पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन हे कायमस्वरूपी दुष्काळी गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणची पाण्याची पातळी 400 फुटाच्या खाली गेलेली असून येथे बोअरवेल खोदली असता नुसता फुफाटा उडत असतो. 400 ते 500 फूट जरी बोअरवेल खोदली तरी पाण्याची साधी ओलसुद्धा लागत नाही. अशा कायमस्वरूपी असणाऱ्या दुष्काळी भागात श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या मंदिरासमोर तीन वर्षांपूर्वी बोअरवेल खोदण्यात आली होती.

परंतु श्री समर्थ वाग्देव महाराजांच्या कृपेने व आशीर्वादाने “देवाची करणी, नारळात पाणी’ या उक्तीप्रमाणे या बोअरवेलला 100 ते 150 फुटांवरच भरपूर पाणी लागले होते. लागलेले पाणी बघण्यासाठी वाठार स्टेशन पंचक्रोशीतील लोकांनी भरपूर गर्दी केली होती. बोरवेलचे काम सुरू असताना त्यामधून पाण्याच्या कारंज्या वीस ते पंचवीस फुटापर्यंत उडत होत्या. तसेच पाण्याचे लोटच्या लोट वाहत होते. बघायला आलेल्या लोकांच्या तोंडून एकच वाक्‍य निघत होते श्री. समर्थाच्या कृपेमुळेच या ठिकाणी भरपूर पाणी लागले.

या बोअरवेलमुळे अक्षरशः पूर्ण वाठार गाव व वाठार स्टेशनच्या लोकांची पिण्याच्या पाण्याची तात्पुरती का होईना पण सोय झाली. त्याचे कारण असे की वाठार स्टेशनच्या स्थानिक प्रशासनाचे पाणी महिना-महिना येत नाही. तसेच पाणीपुरवठा करणारी विहीरसुद्धा कोरडी पडली आहे, तलावात पाणी नाही, शेतावरील विहिरीसुद्धा कोरड्या पडल्या आहेत.
त्यातच तहसीलदारांनी वाठार स्टेशनच्या पूर्वी केलेल्या लोकसंख्येच्या निकषावर चालू केलेले टॅंकर वाठारकरांसाठी अपुरेच पडतात. सध्याच्या काळात वाठार स्टेशनची लोकसंख्या भरपूर आहे, वाठार स्टेशन हे बाजारपेठेचे प्रमुख केंद्र बिंदू असल्यामुळे येथे बाहेरून लोक व्यवसायासाठी येत असतात व याच ठिकाणी स्थायिक होतात.

लोकसंख्या वाढीमुळेच की काय वाठारकरांचा दुष्काळ कायमस्वरूपी हटत नाही. अशातच श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या मंदिराजवळ असणाऱ्या बोअरवेलने लोकांची थोडी का होईना तहान भागवली आहे. वाठार स्टेशन येथील ग्रामस्थ याच ठिकाणाहून कावडीने किंवा प्लास्टिकच्या कैनने सायकलवरून पाणी नेत असतात. तसेच महिलासुद्धा हंडा कळशी ने पाणी नेत असतात. स्थानिक वाग्देव महाराज ट्रस्टीने त्याच ठिकाणी बोअरवेलला इलक्‍ट्रिक मोटर बसवून बाहेरच्या बाजूला पाणपोई तयार केली असून त्याला नळ बसवलेले आहेत व त्याच नळाद्वारे हंडा कळशीने अथवा कावडीने संपूर्ण गाव पिण्यासाठी पाणी तिथून नेत असतात. या असणाऱ्या बोअरवेलने कडक उन्हाळ्यात सुद्धा गावकऱ्यांची तहान भागत असल्यामुळे वाठारकर समाधानी झाले आहेत, तसेच या ठिकाणी पाण्यासाठी दिवसभर लोकांची वर्दळ असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.