निवडणुकी दरम्यान दोन गुन्हे दाखल, 82 जण ताब्यात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अख्त्यारीत पहिली लोकसभा निवडणूक पार पडली. काही किरकोळ घटना वगळता ही निवडणूक शांततेत पार पडली. यामध्ये सोमवारी (दि.29) दोन गुन्हे दाखल झाले तर 82 जणांना ताब्यात घेण्यात आले. निवडणुकी दरम्यान पोलिसांकडे एकूण 63 तक्रारी आल्या होत्या. यामध्ये भोसरी आणि पिंपरी पोलीस ठाण्यांमध्ये एक-एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पिंपरी पोलीस ठाणे येथे दोघांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून 4 जणांना ताब्यात घेतले आहे तर माजी आमदारावर पिंपरी येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस ठाण्याद्वारे 29 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र येथे एकही गुन्हा दाखल झालेला नाही. चिंचवड, देहुरोड, तळेगाव, तळेगाव दाभाडे, आळंदी, चिखली या पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नसल्याने प्रतिबंधक कारवाईचीही वेळ पोलिसांवर आलेली नाही. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 4 ते 5 हजार पोलीस दल तैनात केले होते. त्यानुसार चोख बंदोबस्त होता मात्र तरीही मतदारांना प्रलोभने दाखवणे, उमेदवारांच्या पत्रकांचे वाटप किंवा पैशाचे वाटप करणे असे काही प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत. यात 82 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 63 तक्रारी पोलिसांकडे आल्या त्यातील बरेच फोन फेक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.