भोर (प्रतिनिधी) – दुर्गाडी (ता. भोर) या अतिदुर्गम डोंगरी भागातील गावात पुण्यातील प्रबोधिनी संस्थेच्या आर्थिक मदतीने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून सुमारे 15 हजार लिटर पिण्याच्या पाण्याची क्षमता असलेल्या टाकीचे काम पूर्ण झाले. यावर्षी टाकीच्या कामाला सुरुवात झाली आणि पाठोपाठ लॉकडाउन सुरू झाले, ते दोन महिने लांबले होते. 18 मेनंतर लॉकडाऊन शिथिल होण्यास सुरुवात झाली आणि ग्रामस्थांनी टाकीचे काम मनावर घेतले. पाया बांधकाम पूर्ण केले. यामुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाई कायमची दूर झाली असून, यामुळे गावातीला महिलांची पायपीट थांबणार आहे.
दुर्गाडी हे डोंगराळ भागातले सुमारे अडीचशे लोकवस्तीचे गाव आहे. नीरा-देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हे गाव येत असून, भोरपासून अंदाजे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, धरण गवळ असूनही या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागते. शेवटचे दोन महिने गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धरणाच्या पात्रातून डोक्यावर पाणी आणावे लागत होते. मात्र 2005 च्या सुमारास गावात सरकारची नळ-पाणी योजना आली आणि येथील पाणी टंचाईवर तकलादू उपाय करण्यात आला.
पाणीटंचाई असणाऱ्या शेजारच्या मानटवस्ती गावात प्रबोधिनीचे कार्यकर्ते अजित देशपांडे व अनिल पालकर हे सर्वेक्षणासाठी गेले असता दुर्गाडीच्या ग्रामस्थांनी टाकीची अडचण मांडली. त्यासाठी आवश्यक श्रमदान करण्याची ग्रामस्थांनी तयारी मागील वर्षीच्या (2019) उन्हाळ्यात दर्शवली होती. यासाठी सरपंच लक्ष्मण हिवरे यांनी पुढाकार घेतला तर टाकीची जागा माजी सरपंच भाऊ पोळ यांनी उपलब्ध करून दिली.
तरुणांचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग
लॉकडाऊन काळात गावाबाहेरील व्यक्तीला गावात निवासी राहू दिले जात नाही, असे असताना शेजारच्या गावातील मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीचे घर आठवडाभरासाठी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिले. प्रबोधिनीच्या सुनीता गायकवाड यांनी भोरचे तहसीलदार अजित पाटील यांच्याकडून प्रवासाचा पास मिळविल्यावर लगेचच प्रदीप जाधव आणी अनिल पालकर हे दुर्गाडीला मुक्कामी गेले आणि टाकी बांधकामाला सुरुवात झाली. करोनामुळे शहरातून आलेला मोठा तरुण वर्ग गावात होता. तो श्रमदानासाठी सज्ज झाला आणि टाकीचा आरसीसी सांगाडा लोकसहभागातून उभा राहिला. एवढेच नाहीतर टाकीचा पाया देखील ग्रामस्थांनी श्रमदानातून खोदला होता.