#प्रभात_दीपोत्सव_२०२० : दुर्गा मावशी

– मानसी चापेकर


“कमळं घ्या, कमळं ऽ ऽ ऽ’ खिडकीतून कानावर हाक ऐकू आली आणि आठवलं की, अरेच्चा काल आपण देवीसाठी कमळंच आणायचे विसरलो. नवरात्र चालू झाले की, मी आवडीने देवघरातील एक माहेरची आणि एक सासरची अशा दोन देवींना कमळं वहायचे. साधारणपणे लग्नाला 20 वर्षं झाली आणि 20 वर्ष हा नेमही चालू होता. ह्यावेळी तो देवीने मोडू दिला नाही, ते ह्या कमळे विकणाऱ्या मावशींना पाठवून. अगदी असेच मनात आले. 

खिडकीतून त्या मावशी दिसतात का बघू लागले आणि अगदी लांबून सुद्धा ओळखू येतील अशा
माझ्या रोजच्या भाजीच्या मावशी, दुर्गा मावशीच चक्क कमळे विकताना दिसल्या. गेले सहा महिने करोनामुळे मी भाज्या आणि फळे घरीच ऑनलाइन मागवत असल्यामुळे कित्येक महिने भाजी आणायला बाहेरच न पडल्यामुळे माझी आणि मावशींची खूप दिवस तशी भेटच झाली नव्हती. त्यांना लांबून बघूनसुद्धा मला खूप आनंद झाला.

“मावशी ऽ ऽ ऽ’ म्हणत मी त्यांना जोरात हाक मारली आणि त्यांनीही मला लांबून “ताई… तुम्ही होय… आले आले…’ असं म्हणत मला हसून ओळखीची खुण दिली. मी त्यांना चौथा मजला अशी चार बोटे दाखवून “वर या’ अशी खूण केली.

मी लगेच एका तांब्यात माठातले थंडगार पाणी भरून ठेवले. ही सवय खरं तर सासुबाईंनी लावलेली. त्या म्हणायच्या की आपल्याकडे येणारा माणूस एवढे चार जिने चढून येतो, तर सगळ्यात आधी त्याच्या हातात गार पाण्याचा तांब्या द्यायचा. म्हणजे तो ही खूश आपण पण समाधानी. मी दार उघडेच ठेवले होते, जेणेकरून दुर्गामावशीला “कुठलं घर’ म्हणून कन्फ्युजन नको.

पाचच मिनिटांत “ताई… आले गं…’ करून हाशहुशऽश करत एका हातात कमळांची पिशवी आणि डोक्‍यावर विविध ताज्या भाज्यांची टोपली अशी “माझी दुर्गामावशी’ हजर झाली.
मी तिची टोपली खाली उतरवली. हातातली पिशवी बाजूला ठेवली आणि हातावर सॅनिटायझरही शिंपडले. तिने ते लावून घेतले. मात्र, उदास हसली. मला कळलेच नाही.
“बोल ताई काय देऊ? भाज्या पण आहेत ताज्या आणि तुझी कमळंसुद्धा!’

“अगं मावशी गंमतच झाली मी विसरलेच की आजपासून नवरात्र चालू ते, आणि कमळं आणायची तर पार विसरले, आणि तू आलीस बघ माझा नेम मोडू नये म्हणून मदत करायला; अगदी मां दुर्गा बनून,’ असं म्हणून मी हसले.

थोडासा आडवा बांधा. घट्ट चापून चोपून नेसलेलं नेहमीप्रमाणेच स्वच्छ आणि डार्क रंगाचे नऊवारी. नवरा गेलेला असला तरी कपाळावरचे ठसठशीत कुंकू. कानात सोन्याच्या कुडी, गळ्यात एक सोन्याची चेन, हातभार लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या. खूप सुंदर नाही पण तिचं व्यक्तिमत्त्व फार डोळ्यात भरेल असं होतं. फार कमी वयात नवरा गेल्यामुळे, तिने “हे सौभाग्य अलंकार अंगावरून उतरवणार नाही,’ असे सगळ्यांना बजावले होते. नवरा गेला तेव्हा तिला एक वर्षाचा मुलगा होता, आणि राहते घर! बस बाकी काहीच त्यांच्यासाठी नवऱ्याने ठेवले नव्हते. ती तेव्हापासून घरकामे कर, भाजी विक असे करून मुलाला वाढवीत होती, आणि आता तिचा मुलगा एका कंपनीत नोकरी करत होता, त्याचेही लग्न होऊन त्यालाही एक गोड मुलगी होती.

तिला नात झाली, त्यादिवशी मी बाजारात भाजी आणायला गेले होते तेव्हा बघितलं, जो ग्राहक भाजी घ्यायला येईल, त्याला बर्फी देऊन “लक्ष्मी आली हो आमच्या घरी…’ म्हणून अगदी तोंडभर आनंद मिरवत सांगत होती. आणि हीच दुर्गा मावशी आज उगाचच मला उदास, दु:खी भासत होती. मगाशी ते जे हसू उमटले होते चेहऱ्यावर त्यात एक दु:खी छटा होती, मी विचारायचेच असे ठरवले.

त्या आधी तिनेच सुरु केले, “अगं पटपट घे बघू, मला हे सगळं संपवून वेळेवर घरी जायचे आहे…’
“हो, हो, काय घोड्यावर बसून आली आहेस का? आत्ताच तर आलीस, एक तर इतक्‍या दिवसांनी भेटली आहेस, मला तुझ्याकडून तुझ्या नातीच्या, सुनेच्या गमती जमती ऐकायच्या आहेत, गपचूप बस जरा…’
“ताई… कसली गंमत गं आता? देवानेच माझ्यासोबत सगळी गंमत केलीय…’ आणि तिचे डोळे घळाघळा वाहू लागले. मला कळेनाच की काय करू, आणि ही का इतकी रडायला लागली ते?
“मावशी, नको ना गं रडूस, नाही बघवत तुला असं रडताना.’
“अगं बयो, देवाने कायमचे दिले आहे, आता हे रडणे…’
“काय झालं मावशी; सांग की गं…’
“काय सांगू ताई … हा कोरोना की मरोना, ह्याने सगळं उद्‌ध्वस्त केलं गं माझं आयुष्य!’
“म्हणजे गं मावशी?’

तिने डोळे पुसले, एक ग्लास पाणी प्यायली आणि बोलायला सुरुवात केली.
“थोडक्‍यात सांगते, वेळ नाही अजिबात मला. दोन महिन्यांपूर्वी माझा मुलगा आणि सून ह्यांना हा करोना आजार झाला. मुलाने आधी सांगितलंच नाही की, त्याला बरे नाही वाटत ते, आणि मग जास्त झालं, श्‍वास घ्यायला त्रास व्हायला लागला. सरकारी हॉस्पिटलला ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच सुनेला पण खूप ताप, खोकला. देवाच्या दयेने माझी नात गौरी हिला देवाने ह्यापासून दूर ठेवलं. आणि तुला माहीतच आहे ह्यावेळी नातेवाईक असूनसुद्धा मदत नाही गं मिळत, आणि गावाने तर वाळीत टाकल्यासारखे केलं मला आणि माझी नातीला. ते दोघे हॉस्पिटलमध्ये आणि आम्ही घरी. कंपनीने मदत केली हो ताई, पण नंतर जास्त झालं मुलाचं आणि एका मागून एक धक्के दिले मला दोघांनी. एकदिवस सकाळीच मुलगा गेल्याचे कळले आणि दुपारी सून…’

आणि मावशी परत डोळ्याला पदर लावून रडू लागली. मी तर हे ऐकून खुर्चीतच धपकन बसले. सगळं ऐकत होते आणि माझ्या डोळ्यातलं पाणी ठरत नव्हतं. खूप वाईट झालं होतं सगळं नक्कीच. कितीतरी जवळची ओळखीची माणसं आपल्यापासून हिरावून घेणारा हा महाभयंकर आजार, किती जणांना जन्मभर पुरेल इतकं दु:ख देत होता.

काही माणसं आपल्या काळजाच्या जवळची असतात, ही मावशी त्यातलीच एक. गेल्या वर्षी
माझी आई गेली अचानक, तर ही मला भेटायला घरी आली. किती कमी शब्दांत तिने मला धीर दिला आणि तिच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त माया पाझरत होती. सासूबाई होत्याच पण ही माझी मावशी जणू माझ्या माहेरची ह्या नात्याने दर दोन दिवसांनी मला भेटून जात होती. येताना काही ना काही घेऊनच यायची. एकदा घरी केलेल्या तांदुळाच्या भाकऱ्या घेऊन आली. मऊसूत अशा त्या पांढऱ्या-शुभ्र भाकऱ्या आणल्या तेव्हा म्हणते कशी “गरीबाकडची भाकरी आहे ताई, खाल ना हो? तुम्ही दोन दिवस काही खाल्लं नाही असं परवा भाजी आणायला आलेला दादा बोलला, तेव्हाच ठरवलं, माझ्या हातच्या भाकरी द्यायचा तुम्हाला…’

मी तिच्या समोरच एक भाकरीचा तुकडा आणि तिनेच आणलेला झुणका तोंडात टाकला आणि रडतच म्हटलं, “खबरदार ह्यापुढे गरीब असं काही बोललीस तर, हे बघ खाल्ली आहे तुझी भाकरी…’
तिने डोक्‍यावरून हात फिरवत “सुखी रहा गं बाय माझी’ म्हणत मला अमाप माया दिली त्यावेळी.
हे सगळं सगळं आठवत मायेची पखरण करणाऱ्या ह्या मावशीवर देवाने का अशी परिस्थिती आणली कळतच नव्हतं. कधीही कोणाविषयी वाईट न बोलणारी, शब्दा-शब्दांत अपार माया पेरून बोलणारी ही मावशी आगतिक झाली होती आणि मला काहीच कळत नव्हतं की हिला कसं समजावू?

“मावशी हे काय गं झालं? इतकं सगळं घडलं आणि मला काहीच कसं नाही कोणी सांगितलं. मी नक्कीच काहीतरी मदत केलीच असती गं, तू का नाही मला फोन केलास, मी आठवलेच नाही का तुला?’
“बयो, घडणारं घडतंच गं, ते काय टाळू नसतो शकलो आपण. मी देवाला लाख वेळा जाब विचारला की, मला घेऊन जायचं, ह्या तीन वर्षाच्या पोरीला काय म्हणून अनाथ केलं? पण ते विधिलिखित असतं आपण काही करू शकत नाही…’

तिने पदराने डोळे आणि चेहरा पुसला आणि पदर खोचत म्हणाली, “मी आता परत उभी राहणार आहे माझ्या नातीसाठी, तिला शिकवणार, मोठं करणार, आता दुसरं आहेच काय ताई माझ्याकडे? म्हणून बिगीबिगी फुलं, भाज्या घ्या आणि मला मोकळं करा.’ मी ही मुद्दाम विषय नाही वाढवला.
“मावशी घोटभर चहा घेशील, मस्त आलं घालून करते, घसा शेकला जाईल छान.’
“वेळ नाहीच मला खरंतर, पण ठेव वाईच…’
मी चहा घेऊन बाहेर आले तेव्हा मावशी मोबाईलमध्ये बघून डोळ्यात पाणी आणून कोणाचीतरी आलबेल घेत होती, बहुदा नातीचा फोटो असावा.

“ये ताई, ही बघ माझी नात, कशी नक्षत्रावाणी आहे की नाही…’
मी फोटो बघितला आणि खरंच दृष्ट लागावी असं ते गोड रूप बघून परत एकदा मला भरून आलं, की एवढ्या लहान वयात आई वडिलांचे छत्र गेलं, कसं होणार हिचं? पण डोळ्यातले पाणी मावशीला दिसणार नाही, असे पटकन हातानेच पुसून तिला म्हटलं, “किती गं गोड, गौरी ना नाव हीचं, अगदी तुझ्यासारखी आहे बघ मावशे…’

हिच्यासाठीच मला हे सगळं विकून लवकर घरी जायचं आहे, हिला शेजारी ठेवलं आहे, म्हटलं त्यांना जितकं लवकर येता येईल येते. दोन महिने घरीच होते, मुलाने पॉलिशी काढलेली म्हणून दोन लाख मिळाले आणि कंपनीने पण मदत केली. सगळे पैसे बॅंकेत हिच्या नावाने गुंतवले. पण म्हटलं, रोजच्या पोटापाण्यासाठी आपला पहिला भाजीचा धंदा करायलाच हवा. मग आजचा शुभमुहूर्त बघितला आणि पडले बाहेर, तुझ्याच हातून बोहनी होणार, घे बिगी बिगी आणि कर बघू मला मोकळी…’

“दे मग पाच कमळं, आणि दोन तीन कुठल्याही भाज्या पाव पाव किलो, ताज्याच तर आहेत ना! मी आणते पैसे, ह्या टोपलीत ठेव सगळं असं म्हणून मी आत पैसे आणायला गेले.’
बाहेर आले तर दोनच कमळं बघून मी म्हटलं, “अगं पाच दे कमळं…’
“ताई, तुम्ही नेहमी दोनच घेता; मग आज पाच कशाला? मला दयेपोटी केलेल्या मदतीची सवय नका लावू, जितकं हवं आहे तितकंच घ्या.’

ह्या मावशीला मला एक कडक सलाम ठोकावा असं वाटलं. सहानुभूती मिळवण्यासाठी लोकं काय काय करतात? ही एक आदर्श स्त्री आहे खरंच. मी माझ्या बाजूला राहणाऱ्या मैत्रिणींना फोन करून त्यांच्यासाठी पण दोन-दोन कमळं घेतली आणि मावशीबाई निघाल्या. सगळे पैसे कपाळावर टेकवत काहीतरी पुटपुटली आणि एका छोट्या पर्समध्ये ठेवून ते छातीशी सारलं. “मावशी एक मिनिट,’ असं म्हणून मी आतमध्ये गेले आणि हातात एक छोटा प्लास्टिकचा डबा आणला आणि तिच्या हातात ठेवला.

“तुझ्या नातीसाठी खाऊ आहे, कालच केल्यात गुळपापडीच्या वड्या, चार दिल्यात तिच्यासाठी, आणि ही तुला…’ असं म्हणून डोक्‍यावर टोपली आणि हातात कमळांची पिशवी असलेल्या मावशीला मी चक्क वडी भरवली.

ती खात खातच म्हणाली, “काय हवंय ताई अजून, तुमच्यासारख्या माणसांचे हे असे गोड वागणे, आणि माझ्या भाजीला हातभार. बास, बाकी तू जास्त गोड आहेस ह्या वडीहून…’ असं म्हणून मावशी परत एकदा माझ्या डोळ्यात पाणी आणून घराबाहेर पडली. पण हे पाणी आनंदाचे आणि समाधानाचे होते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.