पिंपरी (प्रतिनिधी) – बंगाली बांधवांच्या दुर्गा आणि काली पूजा उत्सवास शनिवारपासून (दि. 1) सुरवात झाली आहे. या उत्सवानिमित्त अजमेरा कॉलनी येथे बंग भारतीयांच्या वतीने 1 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 3) महाअष्टमीनिमित्त होम हवन होणार आहे. तर, दशमीला सिंदूर उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
अजमेरा कॉलनी येथील रंगास्वामी पेरूमल पिल्ले सांस्कृतिक भवनात शनिवारपासून उत्सवास सुरुवात झाली आहे. दर्गा पुजेचे हे 37 वे वर्षे व काली पुजेचे हे 49 वे वर्षे आहे. दुर्गा पूजा ही अजमेरा कॉलनी येथे तर काली पूजा ही पिंपरी गाव येथे होत आहे.
दुर्गा पूजेनिमित्त अजमेरा कॉलनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथे रोज सकाळी 9 ते दुपारी 1.30 पर्यंत पूजा व सायंकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी षष्टी पूजा, पुष्पांजली आणि उद्घाटना कार्यक्रम झाला. महासप्तमीला पूजा, पुष्पांजली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. महाअष्टमीनित्त सोमवारी (दि. 3) होमहवन, पुष्पांजली, प्रसादाचे वाटप, पूजा, बलिदान आणि आरती होणार आहे.
त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या वेळी कोलकता येथील गायक राघव चट्टोपाध्याय यांचा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि. 4) महानवमी निमित्त पूजा, प्रसादाचे वाटप व सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
दशमीला बुधवारी (दि. 5) सिंदूर उत्सव होणार आहे. या कार्यक्रमात विवाहित महिलांचा मोठा सहभाग असणार आहे. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन करून उत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.