छत्तीसगड – छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात, ‘चिक्की’ खाल्ल्याने एका सरकारी प्राथमिक शाळेतील 28 विद्यार्थी अचानक आजारी पडल्याची बातमी समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली आहे.
या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांने सांगितले की,आजारी पडलेली सर्व मुले आता बरी आहेत आणि काही काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हा शिक्षणाधिकारी (DEO) प्रवाहसिंग बघेल यांनी सांगितले की, कोलियापुरी गावात असलेल्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना सोयापासून बनवलेली चिक्की (शासकीय योजनेंतर्गत) देण्यात आली होती. ते म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, त्या दिवशी शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या किमान 137 विद्यार्थ्यांनी या चिक्कीचा नाश्ता केला होता. त्यापैकी तिसरी आणि चौथीच्या 28 विद्यार्थ्यांनी नंतर पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी केल्या.
बघेल म्हणाले की, आजारी पडलेल्यांपैकी बहुतांश मुली असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून दुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 28 पैकी 20 विद्यार्थ्यांना प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर इतर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यापूर्वी काही काळ रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलांना जास्त चिक्की देण्यात आली, त्यामुळे त्यांना त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
राज्य महामंडळाने पुरवलेल्या चिक्कीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी गृहराज्यमंत्री ताम्रध्वज साहू रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.