कोलकाता – मोहन बागान संघाने एटीके संघाचा 2-1 असा पराभव केला आणि डुरॅंड चषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. गोकुळम केरळा इलेव्हन व गोवा क्लब यांनीही विजयी वाटचाल कायम ठेवली.
चुरशीच्या सामन्यात 34 व्या मिनिटाला बागान संघाच्या जोसेबा बितियाने अप्रतिम फटका मारून संघाचे खाते उघडले. पुन्हा त्यानेच 53 व्या मिनिटाला गोल करीत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 78 व्या मिनिटाला एटीके संघाच्या आशिष प्रधानने गोल करीत सामन्यातील उत्कंठा वाढविली. मात्र, त्यानंतर बागानच्या खेळाडूंनी भक्कम बचाव करीत त्यांना गोल करण्यापासून वंचित ठेवले.
केरळ संघाने चेन्नईयन संघाचा 4-0 असा धुव्वा उडविला. त्याचे श्रेय मार्कोस जोसेफने केलेल्या तीन गोलांना द्यावे लागेल. 39 व्या मिनिटाला त्याने संघाचे खाते उघडले. 66 व्या मिनिटाला केरळला पेनल्टी किक मिळाली. त्याचा फायदा घेत जोसेफने संघाचा दुसरा गोल नोंदविला. हेन्री किसेकाने त्यानंतर दोन मिनिटांनी संघाची आघाडी 3-0 अशी वाढविली. 75 व्या मिनिटाला जोसेफने स्वत:चा तिसरा गोल करीत संघास दणदणीत विजय मिळवून दिला. गोवा संघाने आर्मी ग्रीन संघावर 1-0 असा निसटता विजय नोंदविला.