लोणावळा परिसरातील 350 जणांवर दंडुका!

वरसोली टोल नाक्‍यावर स्थिर स्थावर तपासणी पथक

प्रतिबंधात्मक कारवाई : गावात वाद घालणाऱ्यांना मावळात “नो एन्ट्री’

आदर्श आचारसंहितेचे पालन करा…

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशिल गावांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्‍क बजवावा, कोणी अमिष अथवा धाक दडपशाही करीत असल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. निवडणूक काळात आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी केले आहे.

लोणावळा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी तब्बल 350 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर संवेदनशिल गावांमध्ये भांडण तंटे करणाऱ्या 12 जणांना निवडणूक काळात मावळ तालुक्‍यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच अवैध दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मुंबई प्रोबेशन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलिसांचा “वॉच’ आहे. तसेच “डोकेदुखी’ ठरणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्‍तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वरसोली टोल नाक्‍यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिर स्थावर तपासणी पथक यांनी संयुक्‍त वाहनांची तपासणी करीत आहे. आतापर्यंत 11 लाख 79 हजार 200 रुपयांची रोकड जप्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक लुकडे यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.