चोराडेजवळ वाळू सम्राटांना दणका

तिघांवर गुन्हा दाखल ः दोन ट्रकसह 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

औंध – चोराडे फाटा ते रायगाव रस्त्यावर बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर औंध पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत वाळूसह सुमारे 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा वाळू वाहतुक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

शनिवारी सकाळी औंध पोलिस ठाण्याचे कर्मचारी चोराडे फाटा येथे पेट्रोलिंग करत होते. यावेळी मायणी येथील नदीपात्रातून बेकायदा वाळू भरून कराडकडे निघालेले दोन ट्रक आढळून आले. या ट्रकवर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दोन्ही ट्रकसह वाळू जप्त केली. चालक भीमाशंकर चव्हाण (वय 29, रा. हिपनाळ हिटगी, ता.सिंदगी, जि. विजापूर, सध्या रा. सैदापूर, ता. कराड) गोपाळ बन्नेनवर (वय 23, रा. गोवारे, ता. कराड) यांच्यासह ट्रकमालक अमोल बाळासो देशमुख (रा.गोवारे) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. दोन ट्रक व दहा ब्रास वाळू असा सुमारे 30 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन ट्रक चालकांना ताब्यात घेतले आहे. औंध पोलिस ठाण्यात प्रशांत पाटील यांनी फिर्याद दिली असून तपास सपोनि सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

दोन्ही ट्रकना एकच नंबर

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही ट्रकचे नंबर एकच असल्याने पोलिसांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ट्रकचे नंबर (एमएच 50 – 2107) हा एकच असून पोलिसांना फसवण्यासाठी तसेच कारवाई टाळण्यासाठी गाडी मालकाने नामी शक्कल लढवली आहे. या दोन्ही वाहनांचा रंग एक, बॉडी बांधणी एकसारखी असल्याने वाळू वाहतूकदारांच्या या चलाखीने पोलिसही आश्‍चर्यचकित झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.