मांढरदेव – करोनामुळे दीड-दोन वर्षांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे गुरुवार, 7 रोजी घटनस्थापनेच्या मुहूर्तावर खुली करण्यात आल्याने महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील काळुबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळीच पहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवातील चौथ्या माळेला रविवारी मांढरगडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांमधून सुरु असलेल्या “काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने अवघा मांढरगड दुमदुमुन गेला होता.
दरम्यान, देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. हातामध्ये नारळ ओटी घेऊन भाविक दर्शन घेत होते. गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नसल्याने भाविकांना सभामंडपातून देवीचे दर्शन घ्यावे लागत होते. दर्शनासाठी भाविकांना एक ते दोन तास लागत होते. करोना संदर्भात शासनाने घालून दिलेले नियम पळून भाविक दर्शन घेत होते.
करोनामुळे दोन वर्षांपासून यात्रा-जत्रा बंद करण्यात आल्या असून धार्मिकस्थळेही बंद ठेवण्यात आली होती. मात्र, राज्यभरासह जिल्ह्यातही करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर धार्मिक स्थळे खुली केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रासह इतर राज्यातीलही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वाई तालुक्यातील मांढरदेव येथे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. रविवारी नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेदिवशी मांढरदेव याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सुमारे लाखभर भाविकांनी रविवारी मांढरगडावर गर्दी केली होती.
वाढत्या भाविकांमुळे सुमारे तीन-चार किलोमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा मांढरगडावर पहायला मिळत होत्या. वाहतूक पोलीस तसेच देवस्थान ट्रस्टचे कमांडो यांनी वाहूतक सुरळीत करत भाविकांची गैरसोय टाळण्याचे काम करत होते.