सिंहगड येथील एस. एल. ऍडव्हेंचर गिर्यारोहकांची यशस्वी कामगिरी
वेल्हे -लोणावळ्या जवळील ड्यूक्स नोज व तैलबैला सुळक्याच्या कातळ भिंतीवर लागोपाठ दोन दिवस एस. एल. ऍडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी अतिशय खडतर परिस्थीत यशस्वी चढाई केली. पुण्याहून-मुंबईला जाताना लोणावळ्याच्या घाटातून दिसणारा ड्यूक्स नोज सुळका प्रत्येक प्रस्तरारोहण करणाऱ्याला साद घालत असतो. हा सुळका अतिशय प्रसिद्ध असून नागफणी या नावानेही तो ओळखला जातो.
पुण्यातील सिंहगड स्थित नामवंत गिर्यारोहण संस्था एस एल एडव्हेंचर कायमच नवनवीन सुळके सर करीत आली आहे. या वेळेस संचालक लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनोखी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 300 फुटांचा ड्यूक्स नोझ व 200 फुटांची तैलबैला सुळक्याची अवघड अशी पुढील बाजू सर करणे खूप जिकरीचे असते. परंतू आपल्या कसलेल्या क्लाईम्बर गिर्यारोहकांनी अथांग इच्छा शक्तीच्या जोरावर सलग दोन दिवसात दोन्ही सुळके सर केले.
लीड क्लाईम्बर वाजीरवीर कृष्णा मरगळे यांनी लीड घेत पहिले पाऊल सुळक्यावर टाकले. त्यानंतर शिरीष कुलकर्णी आणि अण्णा मरगळे यांनी सेकंड मन होऊन बिले दिला. यानंतर एस एलच्या टीमने तैल बैला सुळक्याच्या शिखरावर कै. अरुण सावंत सरांना आदरांजली वाहिली. मानसिंह चव्हाण, एस. एल. लहू उघडे, तुषार दिघे, रोहित अंदोडगी, संदेश इवलेकर आदींनी या मोहीमेत सहभाग नोंदवला.
सलग दोन दिवस न थकता मी व माझ्या टीमने अवघड असा ड्यूक्स नोज व तैलबैला सुळका सर केला याचा आनंद आहे. परंतू निस्वार्थीपणे सर्वांना मार्गदर्शन करणारे गिरारोहण क्षेत्रातील द्रोणाचार्य अरूण सावंत हरवल्याचे खूप दुःख होत आहे. प्रत्येक गिर्यारोहकाने कडेकपार चढताना आपल्या जिवाची पहिली काळजी घेतली पाहिजे. -लहू उघडे, संस्थापक एस.एल. ऍडव्हेंचर.