पुणे – वानवडी परिसरात लुल्लानगर येथे ऑरेंज मोटाररॅड केटीएम डयुक शोरुममध्ये शुक्रवारी दोन वाजण्याचे सुमारास तीन अज्ञात इसमांनी शोरुमचे लॉक तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर चार लाख 93 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिराग सुधीर मुथ्था (रा.सॅलीसबरी पार्क,वानवडी) यांनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. मुथ्था यांचे केटीएम डयुक शोरुमचे लोखंडी शटरचे दोन्ही बाजूचे कोयंडा तोडून तसेच काचेचे दरवाजाचे सेंट्रल लॉक तोडून तीन चोरटयांनी दुकानात प्रवेश केला. केवळ सहा मिनिटात त्यांनी दुकानातील रोख दोन लाख रुपये, हेल्मेट रॅक वरील चार हेल्मेट तसेच एक विक्रीसाठीची मोटारसायकल असा एकूण चार लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याआधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करत आहे. याबाबत पुढील तपास वानवडी पोलीस करत आहे.