खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक समस्यांच्या गर्तेत

प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार
सांगवी (वार्ताहर) – सांगवी, पिंपळे गुरव येथे स्मार्ट सिटी अंतर्गत एकाच वेळी सर्व ठिकाणी रस्त्याची खोदाई केल्याने वृद्ध, महिला, विद्यार्थी, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे एका एका लेनचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपळे गुरव परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची नियोजनबद्ध कामे सुरू आहेत. रस्ते प्रशस्त होत आहेत. एकीकडे सुखदायक चित्र भासत असले, तरी दुसरीकडे एकाच वेळी सर्वत्र कामे सुरू असल्याने पिंपळे गुरव येथील नागरिक त्रासून गेले आहेत. सुदर्शननगरमध्ये एकाच वेळी सहाच्या सहा लेन खोदून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण होऊन बसले आहे.

एखादी इमर्जन्सी घटना घडल्यास रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडीही आतमध्ये येऊ शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती ठेकेदारांनी करून ठेवली आहे. हीच परिस्थिती लक्ष्मीनगरसह जुनी सांगवी व नवी सांगवीतील अनेक सोसायट्यांची आहे. खोदाई करून कित्येक दिवस झाले तरी कामे जैसे-थे आहेत. एका एका सोसयटीचे काम पूर्ण करून दुसऱ्या गल्लीतील रस्त्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे. पण ठेकेदार तसे करताना दिसत नाहीत.

नगरसेवकांची आशा कामांना मूकसंमती
स्थानिक नगरसेवक यावर कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांची दररोजची कसरत या नगरसेवकांना दिसत नाही, अशी नाही. पण तरीही एका रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या रस्त्याचे काम हाती घ्यायला त्यांची मूकसंमती असते. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी निर्माण होत आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात
जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव अशा सर्वच ठिकाणी एकाचवेळी कामे सुरू आहेत. त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. धुळीमुळे श्‍वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. दुचाकीस्वरांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्‍याच्या समस्या सुरू झाल्या आहेत. परंतु धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल नगरसेवक अवाक्षरही काढताना दिसत नाहीत. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

एका रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या रस्त्याची खोदाई करू नये, यासंदर्भात आयुक्‍तांना निवेदन दिले आहे. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाडीला गल्ल्यांमध्ये जाताच आले नाही तर त्यानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण?
– अमरसिंग आदियाल, युवा नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.