वाठार स्टेशन, (प्रतिनिधी)- रेल्वेचा दुहेरी मार्ग करत असताना देऊर ता. कोरेगाव येथील गेट क्रमांक ४७ ची रुंदी वाढवली गेली. यावेळी पूर्व बाजूकडील रेल्वे गेटमध्ये वाठारकडून जाताना जाग्यावर वळण असल्याने मोठे ट्रक, मोठे कंटेनर, ट्रेलर यांचा टर्न बसत नसल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
सातारा-लोणंद हा महामार्ग खानदेश, दिल्ली,राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा असल्याने या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. तसेच पुणे बेंगलोर हायवेवरील टोल चुकविण्यासाठी अवजड वाहने या रस्त्याचा वापर करत आहेत.
यामुळे लोणंद-सातारा महामार्गावर कायम वर्दळ असते याच मार्गावर देऊर येथे असलेले रेल्वे गेट क्रमांक ४७ हे रेल्वेच्या दुहेरी मार्गाच्या कामासाठी मध्यंतरी पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते.
रेल्वेने दुहेरी मार्ग पूर्व बाजूस केल्याने जुने रेल्वे फाकटाच्या पूर्वेकडील बाजूची रुंदी वाढली आहे. यावेळी रेल्वेने चुकीचा वळण रस्ता केल्याने फाटकात वाठार बाजूकडून सातारकडे जाताना जाग्यावर वळण असल्याने मोठे ट्रक, ट्रेलर, कंटेनर यांचा टर्न बसत नसल्याने रेल्वे फाटकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे.
सततची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठोस उपाय काढावा, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांकडून होत आहे.
देऊर येथील रेल्वेच्या गेटमध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्ता वळणदार असल्याने अपघाताची शक्यता असून याबाबत रेल्वे प्रशासनाला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय यांना पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे.अविनाश माने (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
माझी स्कूल बस असल्याने मी दररोज देऊर परिसरातील विद्यार्थी लोणंद येथील शाळेत घेऊन जात असतो.
यावेळी देऊर येथील रेल्वे गेट क्रमांक ४७ या ठिकाणी वाठार बाजूकडून जात असताना गेटमध्ये वळणदार रस्ता असल्याने वाहतूक कोंडी होते, यामुळे मुलांना शाळेत पोहोचवताना विलंब होतो. रेल्वे प्रशासनाने यावर उपाययोजना करावी. भिमाशंकर अहिरेकर माजी उपसरपंच वाठार स्टेशन