विठ्ठल गोराणे
भानुदास मुरकुटे यांचा बाहेरच्या उमेदवारास विरोध
श्रीरामपूर – माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी बाहेरच्या उमेदवारास विरोध करण्याचे जाहीर केले आहे. मात्र कुणाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनीही माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांना मदत करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र ना. विखे यांनी कांबळे यांना मदत करण्याची भूमिका घेतल्याने तेही अडचणीत आले आहेत. त्यामुळे ऐनवेळी मुरकुटे व ससाणे एकत्र येतात की आणखी दुसरी भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार मुरकुटे हे तत्वनिष्ठ व स्वाभिमानी राजकीय पुढारी आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ना. राधाकृष्ण विखे व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा राजकीय हस्तक्षेप त्यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक उमेदवाराला प्राधान्य दिले. मात्र कोणत्या उमेदवाराचे काम करायचे हे स्पष्ट सांगितलेले नाही. मुरकुटे सध्या उत्तर भारत दौऱ्यावर आहेत. विखेंचे सहकार्य माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांना झाल्यासते त्यांना मदत करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण विखे-मुरकुटे, मुरकुटे-ससाणे हे राजकीय वैर सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे विखे किंवा थोरात यांचा उमेदवार त्यांना मान्य होणार नाही.
त्यातच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचा ना. विखे यांच्यावर मोठा विश्वास आहे. असे असले तरी ससाणे यांनी कांबळे यांचा प्रचार करणार नसल्याने मेळावा घेऊन सांगितले आहे. हे उघड असताना विखे यांनी ससाणे यांच्या काही कार्यकर्त्यांना बोलावून कांबळे यांचा प्रचार करा, असे सांगितले. त्यातच एकीकडे विखेंच्या सहकार्याने अपक्ष उमेदवार देण्याची तयारी ससाणे यांची असताना त्यांच्याच गटातील काही कार्यकर्ते कॉंग्रेसला पाठिंबा द्यावा, अशी मागणी करत आहेत. ससाणे गटातील मतांचे ध्रुवीकरण नको, म्हणून कॉंग्रेसला सहकार्य करून उमेदवार निवडून आणण्यासाठी ससाणे गटातील दुसऱ्या गटाने प्रयत्न सुरू केले आहेत.
याबाबत निर्णय होणार तो होईल. परंतु विखेंची कांबळेना सहकार्य करणारी भूमिका ससाणे आणि मुरकुटे यांना अडचणीत आणू शकते का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ही भूमिका ससाणे-मुरकुटे यांना अडचणीत आणणार किंवा नाही, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच काही कार्यकर्ते ससाणे आणि मुरकुटे यांनी दोघांनी एकत्र यावे व तालुक्याच्या विकासाचा निर्णय घ्यावा, यासाठी प्रयत्नात आहे. ससाणे आणि मुरकुटे यांच्या निर्णयाकडे मतदारांचे लक्ष आहे.