पुनर्वसनाअभावी मेट्रोचे काम रखडणार

एसआरएकडून सदनिका देण्यास नकार

पुणे – मेट्रो मार्गात बाधीत होणाऱ्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यासाठी महामेट्रोकडून “एसआरए’कडे सवलतीच्या दरात भाडेकराने घरांची मागणी केली होती. मात्र, “एसआरए’कडून या सदनिका उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली असून मेट्रोने ही घरे सवलतीच्या दरात विकत घ्यावी, असे महामेट्रोला कळविण्यात आले. दरम्यान, याबाबत निर्णय घेण्यास महामेट्रोला उशीर होण्याची शक्‍यता असल्याने त्याचा फटका मेट्रोच्या कामास बसण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज-कोथरुड ते रामवाडी या दोन मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गांमध्ये काही ठिकाणी 800 ते 900 झोपड्या बाधीत होत आहेत. त्यात प्रामुख्याने शिवाजीनगर येथे मेट्रो स्थानकासाठी कामगार पुतळा आणि राजीव गांधी वसाहत या दोन झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. याठिकाणी जवळपास 700 ते 800 झोपडीधारक आहेत.

या झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) शहरातील इमारतींमध्ये स्थलांतर करण्याची नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते. त्यासाठी एसआरएच्या सदनिका उपलब्ध करुन देण्याची मागणी महामेट्रोकडून प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. मात्र, मेट्रो हा स्वतंत्र कंपनीचा प्रकल्प आहे. त्यामुळे या कंपनीच्या मार्गात बाधीत होणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महामेट्रोचीच असल्याचे एसआरए प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच एसआरएच्या सदनिका सवलतीच्या दरात उपलब्ध होऊ शकतात, त्या महामेट्रोने घ्याव्यात, असे एसआरएने सूचविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.