नेतेमंडळींना प्रचाराची चिंता तर जनतेला दुष्काळाची

माढा लोकसभा मतदारसंघ
आकाश दडस

बिदाल – लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच आता राजकीय वातावरण माढा लोकसभा दुष्काळात मतदारसंघात तापू लागले असले तरी माणदेशवासियांना कडक उन्हाळा आणि तीव्र दुष्काळाची चिंता जाणवू लागली आहे. राजकीय नेत्यांनी प्रथम दुष्काळासंबंधीची उत्तरे प्रथम द्यावीत, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाणी याची टंचाई यामधून कसा मार्ग काढावा यावर बोलावे, मग राजकारण करावे, अशी मते व्यक्त होत आहेत.

माढ्यातून खासदार होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे सुभाष देशमुख, रासपाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर, वंचित बहुजन आघीडीचे ऍड. विजयराव मोरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रचाराच्या कामला लावले. मात्र, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, कॉंग्रेस पक्षांनी सच्चा कार्यकर्त्यांना रोजगार मात्र दिलाच नाही. नेत्यांनी रोजगार न दिल्याने युवा कार्यकर्त्यांची लग्नेसुध्दा होत नाहीत. याकडे पक्षातील वरिष्ठांसह तालुक्‍यातील नेतेमंडळींनी लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, सध्या तालुका-गावपातळीवरील नेते आपले आडाखे बांधण्यात दंग आहेत. चाचपणी सुरू आहे. त्यातून चर्चा, उखाळ्या-पाखाळ्या रंगल्या आहेत. नेते आणि चेले यामधून राजकारणाचा अंदाज घेत आहेत. यामधूनच एखाद्या नेत्याच्या सर्वच कार्यक्रमांना येणाऱ्याची अचानक गैरहजेरीवर चर्चा होत आहे. काही नेते आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमाला दांडी मारत आहेत. कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. प्रत्येक तालुक्‍यात किमान चार-पाच तगडे इच्छुक असल्याने राजकीय हालचाली जोरात सुरू आहेत.

राजकीय वातावरण असे रंगले असताना उन्हाळा जाणवू लागला आहे. पाण्याची टंचाई डोके वर काढू लागली आहे. पाऊस कमी झाल्याने पिके मातीत गेली आहेत. आता पाणी, चारा यांची चिंता सतावू लागली आहे. यावर्षी अतिशय तीव्र दुष्काळाला तोंड द्यावे लागण्याची चाहूल ग्रामीण जनतेला झाली आहे. पाणीसाठे फेब्रुवारीच्या तिसऱ्याच आठवड्यात संपू लागले आहेत. मोठ्या जनावरांच्या चारा-पाण्याची सोय शेतकरी कशीबशी करत आहेत. परंतु मेंढपाळांना मेंढ्या, शेळ्या यांच्या चारा-पाण्याची सोय करत असताना नाकी नऊ आले आहे. सरकारी यंत्रणेला याचे गांभीर्य अद्याप उमगले आहे, असे वाटत नाही. त्यामुळे राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणाही निवडणुकीच्या तयारीत मग्न झाल्यासारखी वाटते आहे. त्यामुळे अचारसंहिता लागू झाल्यावर नेतेमंडळी प्रचाराचा धुरळा उडवणार असले तरी आपले कसे होणार याची चिंता ग्रामीण भागातील जनतेला सतावू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.