देहूगाव – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी (दि.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या आगमनाने देहू नगरपंचायत प्रशासनासह सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागले आहे. विविध सेवा सुविधा व सुरक्षा कामांसाठी लगबग सुरू झाली आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरातील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर देहू माळवाडीलगत लष्कराच्या मोकळ्या मैदानावर संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भव्य मंडप तयार करण्यात आले असून सुमारे 40 हजार भाविक वारकऱ्यांसह नागरिकांना बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. हेलिपॅड सज्ज करण्यात आले आहेत .पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने येणार व जाणार आहे. त्या मार्गावर कामांची लगबग सुरू आहे.
रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण करणे, पदपथ मोकळे करणे, रस्त्यांच्या दुतर्फा साईड पट्टयांवर मुरमीकरण करणे, पथदिवे बसवणे, रस्त्यांवर व इतरत्र लावलेले फलके, बॅनर विद्युत पोल वरील जाहिरातींचे फलक काढणे, रस्त्यालगतचे बोर्ड हटविणे, बोर्ड काढणे,विद्युत तारा,विद्युत डीपी दुरुस्त करणे. बंद पथदिवे सुरू करणे, पथदिव्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या, विद्युत तारांमध्ये धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे. अतिक्रमण काढणे ,स्वच्छता करणे, नाले साफ सफाई करणे, भूमिगत मल:निस्सारण वाहिन्या स्वच्छ करणे आदी कामांची लगबग सुरू आहे.
पंतप्रधानांचा दौरा व आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिरामध्ये रंगरंगोटीचे काम सुरू आहेत. इंद्रायणी नदी पात्रात पाटबंधारे विभागकडून पाणी सोडण्यात आले आहे. इंद्रायणी नदी घाट परिसर दुरुस्ती काम सुरू आहे.
संवाद सभेच्याठिकाणी उपस्थित राहणाऱ्या भाविक, वारकऱ्यांना दिंडीकऱ्यांना संस्थानच्या वतीने पास देण्याची सुविधा करण्यात आली आहे. मंदिरामध्ये सुसज्ज सी.सी.कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर असणारे मंदिरातील थेट डिजिटल दर्शन सेवा सुरू करण्यात आले आहे .त्यामुळे भाविकांना मुख्य मंदिराच्या बाहेरच मंदिरातील दर्शन होणार आहे.
परिसराला छावणीचे स्वरूप
सुरक्षितेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह सर्व पोलिस व प्रशासनाची धावपळ सुरू आहे. देहू परिसरात घरोघरी तपासणी,परीसर छाणनी करण्यात येत आहे. मुख्य मंदिर तसेच सभामंडप परिसरावर शासकीय विविध अधिकारी, पदाधिकारी, आजी-माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यमंत्री यांचा पाहणी करण्यासाठी दौरा होत आहे. पोलीस बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.