लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचणीतून ‘तो’ वळला गुन्हेगारीकडे

मोबाइल हिसकवायला सुरुवात

पुणे -करोनामुळे सातत्याने लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. यामुळे आर्थिक ताळमेळ बसत नसल्याने काहींनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी चक्‍क जगण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग निवडला. अशीच एक घटना बंडगार्डन पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उघडकीस आली. लॉकडाऊनमध्ये चहाचा स्टॉल बंद झाल्याने उदरनिर्वाहासाठी मोबाइल चोरी करण्यास सुरुवात केली. त्याला अटक केल्यावर त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले.

बोट क्‍लब रोड, मार्केटयार्ड, बंडगार्डन आणि लगतच्या भागातील पादचारी आणि वाहनचालकांकडून मोबाइल हिसकावण्याच्या आरोपावरून कोरेगाव पार्क पोलिसांनी ताडीवाला रोड येथील प्रभाकर रमेश सिंग (वय 21) याला अटक केली. सिंह ताडीवाला रोडवरील त्याच्या भाड्याच्या घराशेजारी चहाचा स्टॉल चालवत होता. तो गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीरित्या हा स्टॉल चालवित होता. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे तो बंद झाला. यामुळे आर्थिक संकटात सापडल्यामुळे त्याने मोबाइल हिसकवायला सुरुवात केली. सिंह हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो शहरात एकटाच राहतो.

तो नियमित उत्तर प्रदेशात आपल्या कुटुंबियांना पैसे पाठवित होता. तो दुचाकीवरून संध्याकाळच्या वेळेत एकट्या फिरणाऱ्या व्यक्‍तींना हेरत होता. एखादा व्यक्‍ती हातात मोबाइल घेऊन बोलत जाताना दिसताच तो हिसकावून पळ काढत. चोरलेले मोबाइल तो विकण्याच्या तयारीत होता. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, सहायक निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक रुपेश चाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.