प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गाजली वाई पालिकेची सभा

विरोधकांच्या प्रभागात काम करीत नसल्याचा नगराध्यक्षांवर आरोप

चर्चेचे गुऱ्हाळ अन्‌ विषयांचा चोथा, सर्व विषयांना मंजुरी

मंजूर विषय

नावेचीवाडी( गंगापुरी) येथील पुलाच्या कामाला मंजुरी, सोनगीरवाडी स्मशान भूमी परिसर डागडुजी, शिवाजी उद्यान व सोनगीरवाडी बगीचा मध्ये नवीन खेळणी बसविणे, वाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्राचे नूतनीकरण, सोनगीरवाडीतील हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती, गणपती आळीतील, ब्राह्मणशाही, धर्मपुरी, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी, प्राध्यापक कॉलनी, फुलेनगर, नावेचीवाडी, किसनवीर चौक ते विष्णू मंदिर, व रविवार पेठेतील रस्त्याचे डांबरीकरण करणे, वाई विविध ठिकाणच्या रस्त्यांवर कॉंक्रीटीकरण करणे, मुस्लीम समाजाच्या दफन भूमिपर्यंत असणाऱ्या ओढ्यावर पाईप टाकणे, प-1 प-2 चे बोर्ड बसविणे, बौद्ध वस्तील पोल बसविणे यासारख्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.

वाई – प्रशासनाकडून विशेष सभेचा अजेंडा मांडताना चर्चा न करणे, प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालणे, भंडारी या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी, पालिकेचा मुख्य क्‍लार्क अनंत भारस्कर याची खाते निहाय चौकशी करणे, दहाव्या वित्त आयोगातील कामे विरोधकांच्या प्रभागात न करणे, यासारख्या विषयांनी गुरुवारी झालेली वाई नगरपालिकेची विशेष सभा आरोप-प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांच्यासह प्रशासनावर ताशेरे ओढत सुमारे तीन तास चाललेल्या विशेष सभेत एकूण सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली.

पालिका प्रशासन अजेंड्यावरील विषयासंदर्भात सदस्याशी चर्चा करीत नसल्याने उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह सर्व सदस्यांनी अधिकाऱ्याना धारेवर धरले. गुरुवार दि. 30 रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बोलविलेल्या विशेष सभेत मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांनी प्रशासनाची बाजू मांडल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी सभागृहात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील ज्या महनीय व्यक्तींचा मृत्यू झाला अशा व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर काही अभिनंदनाचे ठराव ठेवण्यात आले. वाई शहरात दररोज गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या वर्गीकरण कारणाबाबत ऐनवेळीच्या विषयाने उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी कडक शब्दात प्रशासनावर ताशेरे ओढत पालिकेचा कोणताही प्रकल्प नियमानुसार चालू नसल्याचा व ठेकेदार करारानुसार काम करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

पालिका अस्थापनप्रमुख अनंत भास्कर यांना पालिकेतून काढून टाकण्यात यावे, त्यांचे वेतन थांबविण्यात यावे, अशी आग्रही भूमिका सर्वच नगरसेवकांनी घेतली. दरम्यान, नगरसेवक चरण गायकवाड यांनी विशेष सभा सुरु होण्यापूर्वी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्यासह प्रशासन व पालिका पदाधिकारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उपनगराध्यक्षांसह कोणत्याही सदस्याला विश्‍वासात न घेताच सभेचा अजंठा काढण्यात येतो, एकमेकांच्या समन्वयाशिवाय पालिकेचा कारभार चालू शकत नाही, विरोधी नगरसेवकांना गृहीत धरले जात असेल तर आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पालिकेच्या कामकाजावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. विशेष सभेत तीर्थक्षेत्र आघाडीचे आरोग्य सभापती चरण गायकवाड, राजेश गुरव, भारत खामकर, दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे यांच्यासह वाई विकास महाघाडीचे नगरसेवक महेंद्र धनवे, रुपाली वनारसे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)