अहमदाबाद – गुजरातमधील महत्वाचे व्यावसायिक केंद्र असणाऱ्या अहमदाबादमधील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या शहरात उद्यापासून (शुक्रवार) रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे.
अहमदाबादेत रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत संचारबंदी असेल. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले आहे. लोक मोठ्या संख्येने बाजारपेठा आणि इतर ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे करोना फैलाव वाढण्याची शक्यता आहे.
त्यातून काही निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे नमूद करत गुजरात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली. आता पुढील आदेशापर्यंत अहमदाबादेत रात्रीची संचारबंदी असेल. त्या शहरात मागील महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज सुमारे 130 नवे करोनाबाधित आढळत होते.
मात्र, चालू महिन्यात ती संख्या वाढल्याचे चित्र आहे. आता अहमदाबादेत दररोज 200 पेक्षा अधिक बाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या 2 लाखांच्या घरात पोहचली आहे. त्या राज्यात आतापर्यंत 3 हजार 830 बाधित मृत्युमुखी पडले आहेत.