संतोष खांबे
पाझर तलावावरील धबधबा निसर्गप्रेमींसाठी ठरतोय आकर्षण
वडगाव हवेली – गत दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच ठिकाणचे ओढे, नाले व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा वातावरणात फिरायला जाण्याची सर्वांनाच हौस असते. मात्र कराड-पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्याने अनेकांना यावर्षी हा आनंद लुटता येत नाही. कराडपासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वडगाव हवेली येथील पाझर तलावावरील धबधबा यंदा ओसंडून वाहत असून युवकांना खुणावू लागला आहे. त्यामुळे निसर्गाचा स्वच्छंद आनंद लुटण्यासाठी तालुक्यातील युवक-युवतींची गर्दी होत आहे.
परिसरात पावसाची संततधार सुरु असल्याने येथील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला आहे.
येथील चौरंगनाथ डोंगराच्या पायथ्याला ग्रामदैवत सिद्धनाथ मंदिरालगत हा तलाव असल्याने येथील निसर्गसौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. सांडव्यावरून खडकावर पडणाऱ्या पाण्यामुळे याला धबधब्याचे स्वरूप आल्याने परिसरातील निसर्गप्रेमींचे लक्ष आपसूकच इकडे वेधत आहे. गेली अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी हा पाझर तलाव इतक्या जलदगतीने व मोठ्या प्रमाणावर भरला आहे. तसेच तलावाच्या पूर्वेस डोंगरामध्ये वाघधरा नावाच्या नाळीमध्ये असणारा मोठा धबधबाही येथील निसर्गात अधिकच भर घालत आहे.
अनेकदा पावसाळ्यामध्ये निसर्गप्रेमी शेकडो किमीचा प्रवास व हजारो रुपये खर्च करून विविधठिकाणी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जात असतात. परंतु आपल्याच भागातील निसर्गाचे महत्व अनेकांना दृष्टीस येत नाही. यंदा मात्र कृष्णा-कोयना नद्यांना महापूर आल्याने कराड तालुक्यातील युवक-युवतींची व निसर्गप्रेमींची हा निसर्ग देखावा पाहण्यासाठी पाच दिवसांपासून गर्दी होताना दिसत आहे.