मंचर – बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणारे खेड तालूक्यातील श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर आज (मंगळवार) दुपारपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले. पुणे शहर परिसरात वाढणाऱ्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भिमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शासनाचे पुढील आदेश येईपर्यत मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितले.
करोनाच्या वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिकांनी टाळावे असे आवाहन राज्य प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर हे जागृत देवस्थान आहे. याठिकाणी देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे देवस्थान प्रशासनाने आज तातडीने बैठक घेऊन मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक झाली. या बैठकीला देवस्थानचे विश्वस्त पुरषोत्तम गवांदे, दत्तात्रय कौदरे, अशिष कोडिलकर,प्रसाद गवांदे व इतर पूजारी व देवस्थान परिसरातील दूकानदार उपस्थित होते. या बैठकीनंतर आरती करण्यात आली आणि त्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले.
या संदर्भात अधिक माहिती देताना कौदरे म्हणाले, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी असणारी देवस्थाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानूसार आम्ही हा निर्णय घेतला आहे. करोना व्हायरसच्या भितीने गेले चार दिवसांपासून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा रोडावली होती. त्यामुळे अखेर गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला. भाविकांनी सुद्धा भिमाशंकर येथे दर्शनासाठी येऊ नये. मंदिर बंद असले तरी नियमित होणारे धार्मिक विधी मात्र सूरू राहणार आहेत.
भिमाशंकर देवस्थानच्यावतीने सुद्धा करोना संदर्भात खबरदारी घेण्यात येत आहे. मंदिरा परिसरात पुर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. ठिकठिकाणी करोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. देवस्थानच्या परिसरात असणाऱ्या दुकानदारांना सुद्धा आवाहन करून दुकाने काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावी असे आवाहन करण्यात आले असल्याचे ही कौदरे यांनी सांगितले.