विखेंच्या सक्रियतेमुळे शिर्डीतील गणिते बदलली 

विखेंचे कार्यकर्ते लोखंडेंच्या प्रचारात सक्रिय
अवसान गळालेल्या शिवसेनेला मिळाला ऑक्‍सिजन

बाळासाहेब सोनवणे

राहाता – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व विखेंना मानणारा श्रीरामपूर, राहाता तालुक्‍यातील कार्यकर्ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाल्यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. उत्तरेत शिवसेना व भाजपची ताकद कमीच आहे. असे असतांनाही दोन वेळा शिवसेनेचा खासदार या मतदारसंघात झाला. मात्र यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल तीव्र नाराजी या मतदारसंघात आहे. त्यामुळे खा. सदाशिव लोखंडे यांच्या लढतील फारसे महत्त्व नव्हते. परंतु आता विखे पित्रापुत्रांसह विखे गट सक्रिय झाल्याने शिर्डीतील गणिते बदलत चालली आहे. अवसान गळालेल्या शिवसेनेला आता ऑक्‍सिजन मिळाला असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या राहाता तालुक्‍यात विखेंनी बैठका व गाठीभेटी सुरू केल्या आहे. अर्थात गेल्या पंधरा दिवसांपासून या तालुक्‍यात शिर्डी लोकसभा निवडणुकीचे वातावरणच दिसत नव्हते. शेजारच्या संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्‍यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या जाहीर सभा, बैठका होत होत्या. परंतु शिर्डी विधानसभा मतदारसंघ जो विखेंचा बालेकिल्ला समजला जातो. त्या ठिकाणी मात्र एकही सभा कोणत्याही राजकीय पक्षांची झाली नाही. अर्थात या मतदारसंघातील बहुतांशी नेते व कार्यकर्ते हे डॉ. विखेंच्या प्रचारार्थ नगर दक्षिणेत होते. परंतु आता विखे पूर्णपणे युतीसाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यात विखेंनी दिलेला विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा कॉंग्रेसने स्वीकारल्याने आता विखेंनी युतीच्या उमेदवारांसाठी रान पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. डॉ. सुजय विखे यांनी थेट संगमनेरपासून प्रचार सभा सुरुवात केली आहे.

राहाता तालुक्‍यात निवडणूक आहे की नाही हे कळत नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तालुक्‍यात निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. विखेंनी तालुक्‍यात युतीचा प्रचार सुरू केला आहे. गाठीभेटींसह बैठका घेण्यात येत आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघात भगवे वादळ आता सुरू झाले आहे. 1997 युतीचे सरकार असतांना तालुक्‍यात भगवे वादळ होते. त्यावेळी विखे शिवसेनेत होते. आता ते भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे. डॉ. सुजय विखे यांनी तर भाजपमध्ये प्रवेश करून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढली. सध्या तरी विखे गटा हा संपूर्णपणे भाजपमय झाला आहे. आता तालुका देखील भाजपमय होण्यास वेळ लागणार नाही.
माजीमंत्री बाळासाहेब थोरात व विखे यांच्यातील संघर्ष जिल्ह्यालाच नाही तर राज्याला सर्वश्रृत आहे. कॉंग्रेसमध्ये असतांनाही या दोन्ही नेत्यांचे कधी पडले नाही.

आता तर दोन्ही नेत्यांचे पक्ष वेगळे असल्याने दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना अडचणी आणण्याचे उद्योग होणार आहे. त्यातून तालुक्‍याची अस्मिता हा मुद्दा उपस्थित होणार. याचा प्रत्यय आता या लोकसभा निवडणुकीत येणार आहे. प्रचाराला आता तसा एकच तोही आजाच दिवस राहिला असला तरी शिर्डीतील गणिते बदलण्यास सुरूवात झाली आहे. एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशी झाली असून अपक्ष उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे किती मते खाणार यावर कॉंग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांचे मताधिक्‍क्‍य अवलंबून आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.