आवर्तनाअभावी कर्जत तालुक्‍यात पिके जळाली

कुळधरण, येसवडी, राशीन, बारडगाव भागात पिकांचे नुकसान; शेतकरी चिंताग्रस्त

कर्जत  – तालुक्‍यातील कुकडी लाभक्षेत्रात येणाऱ्या अनेक भागात ओव्हरफ्लोचे आवर्तन अद्यापही आले नसल्याने शेतातील पिके करपली आहेत. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी पाऊस न झाल्याने तालुक्‍यात पाण्याची भीषण टंचाई भासत आहे. महिन्यापूर्वी ओव्हरफ्लोचे क्‍लोज पाणी सोडण्याची केलेली घोषणा हवेत विरून गेली आहे. शेतातील पिके जळून चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

दुष्काळी परिस्थितीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर चारा तसेच पाणीटंचाईचे भीषण समस्या आहे. शेतातील मका, बाजरी, ऊस, सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी तसेच फळबागा करपल्या आहेत. जून, जुलैमध्ये झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. पुढे पाऊस होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते तसेच मशागतीवर मोठा खर्च केला.

पावसाने ताण दिल्यानंतर शेतकऱ्यांना पुढे आवर्तनाचे वेध लागले. पालकमंत्री राम शिंदे यांनी तालुक्‍यातील ठिकठिकाणच्या भाषणातून आवर्तन सोडण्याचे आश्‍वासन दिले. मात्र आता पीके जळून गेली तरीही पाणी येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पिके जळून गेल्याने त्याची काढणी करून जनावरांना चारा देणे सुरू केले आहे. कुकडीचे आवर्तन नियमित मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र त्याचा कसलाच परिणाम यंत्रणेवर होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सोशल मीडियात चमकोगिरी करणाऱ्या पुढाऱ्यांवर रोष

कुळधरण, राशीन जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुकडीचे लाभक्षेत्र आहे. कुकडीचे आवर्तन हा येथील कळीचा मुद्दा आहे. करमनवाडी भागात कित्येक वर्षांपासून पाणी जात नाही. पालकमंत्र्यांनी पाणी सोडण्याची घोषणा करताच सोशल मीडियातून चमकोगिरी करणाऱ्या गाव पुढाऱ्यांना मात्र जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्येही हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here