धार्मिक स्थळांमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वर्दळ वाढली

– महेश विधाटे

पुणे शहराचे दक्षिण प्रवेशद्वार व एतिहासिक वारसा असलेल्या कात्रज-कोंढवा परिसराचा गेल्या काही वर्षात झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच कात्रज तलाव परिसरात उभारले गेलेले नेत्रदिपक प्रकल्प व विकास कामांची नांदी पहायला मिळते. इस्कॉन मंदिर व शत्रुंजय मंदिर, आगम मंदिर या धार्मिक स्थळांनी अधिकची भर घातली आहे. हजारो भाविकांमुळे या भागातील नावलौकीका बरोबरच पुरक व्यावसायांना देखील चालना मिळत असल्याचे चित्र सुखावणारे आहे.

कात्रज-कोंढवा रोड परिसरात सुमारे सहा एकर जागेत इस्कॉन संस्थेचे संस्थापक ए.सी.भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या संकल्पनेतून 23 फेब्रुवारी 2013 रोजी तात्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भव्य राधाकृष्ण मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.

या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर, बालाजी मंदिर, जगन्नाथ बलदेव, सुभद्रा मंदिर आणि गौरगिताई मंदिरे आहेत तसेच हिंदु धार्मिक ग्रंथालय, आश्रमातील ब्रम्हचार्यांसाठी अतीथीगृह, फुल शेती, उद्यान उभारण्यात आले आहे. या इस्कॉन मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या दरमहा चाळीस ते पन्नास हजारांच्या घरात असते. या ठिकाणी पाच हजार शिष्य कुटुंब नित्याने भक्तीसाठी उपस्थित असतात.

या संस्थेतर्फे कॉलेजच्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांचे सेंटर स्थापन केले आहे. हे विद्यार्थी पुणे शहर व उपनगरात भक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे काम करतात. शनिवार व रविवार किर्तनाचे आयोजनही करण्यात येते. या मंदिरात दोनशे पन्नास ब्रम्हचारी पुर्णवेळ सेवेत असतात.

वर्षभरात 14 हून अधिक उत्सव मंदिरात साजरे केले जातात यामध्ये गोकुळ अष्ठमी, राम नवमी, नरसिंह चतुर्थदशी, गौर पौर्णिमा, नौका विहार, चंदन यात्रा, गोवर्धन पुजा व कोजागिरी पौर्णिमा आदी उत्सव साजरे केले जातात. अन्न अमृत या उपक्रमाद्वारे शासनाच्या मदतीने दररोज चाळीस हजार विद्यार्थ्यांना मध्यांन्न भोजन दिले जाते. वृद्धाश्रम, अपंग कल्याण, अनाथाश्रम तसेच कारागृहातील कैद्यांसाठी भगवत गीता ग्रंथाचे मोफत वितरण केले जाते. याशिवाय विविध शाळेत जावून मुलांना संस्काराचे धडे दिले जातात तसेच आगम मंदिर व शत्रुंजय मंदिर येथे जैन समाज बांधव मोठ्या संख्येने येतात. धार्मिक उपक्रम देखील साजरे होत असतात. या धार्मिक स्थळामुळे या भागाची वेगळी ओळख निर्माण झाली असुन पुरक व्यावसायांना चालना मिळत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.