नियोजित विकासामुळे कोथरुड बनले ग्लोबल 

पूर्वी कोथरूड पुणे शहरापासून तीन किलोमीटरवर असणारे हवेली तालुक्‍यातील एक छोटेसे गाव होते. शेतीपूरक व्यवसाय चालणाऱ्या भागातील पेरूच्या बागा प्रसिद्ध होत्या. पुणे शहराचा विकास होऊ लागल्याने कोथरूड गावातही बदल होत गेले सुरुवातीच्या काळात कोथरूडमध्ये जाऊन स्थायिक होण्याचा विचारही शहरांमधील नागरिकांच्या मनात येत नव्हता. 1979 पासून कोथरूड गावाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मयूर कॉलनी विनित सोसायटी गांधी भवनचा काही भाग या परिसरात कॉलनी स्वरूपात बंगला पद्धतीच्या बांधकामांना सुरुवात झाली. शहरातील निवृत्त झालेल्या लोकांनी व कर्मचारीवर्गाने शहरापासून जवळ व शांत निसर्गरम्य असणाऱ्या कोथरूडमध्ये स्थायिक होण्यास प्राधान्य दिले. शहर वाढल्यानंतर मूळच्या पुणेकरांने इतर कुठल्याही उपनगराला पसंती न देता कोथरुडमध्ये जाणे पसंत केले. त्यामुळे कमी वेळात विकसित झालेले उपनगर अशी कोथरूडला नवी ओळखसुद्धा मिळाली. 

1984 मध्ये या भागांमध्ये अपार्टमेंट व ओनरशिप पद्धतीने बांधकामे सुरू झाली. शहरातील वाढत्या गजबजाटामुळे पेठांमधील नागरिकांनी शहरात राहण्यापेक्षा कोथरूडमध्ये स्थायिक होण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे कोथरूडमधील बांधकामांची संख्या वाढत गेली.1987 ते 89 मध्ये कोथरूडचा पुण्याचे उपनगर म्हणून खऱ्या अर्थाने विकास होण्यास सुरुवात झाली. कोथरुड चा विकास नियोजनपूर्वक होत असल्याने व सर्व मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध असल्याने या भागाकडे नागरिकांचा ओढा कायमच वाढत गेला व त्यामुळे सर्वत्र बांधकामांची संख्या वाढत गेली. गुंतवणूक म्हणूनही पेन्शनर नागरिकांनी व व्यावसायिकांनी या भागांमध्ये सदनिका घेण्यास सुरुवात केली त्यामुळे या परिसरात सदनिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली.

आजच्या परिस्थितीमध्ये नवीन बांधकामांसाठी कोथरूडमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नसल्याने मोजकीच बांधकामे सध्या चालू आहेत. काही ठिकाणी पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आजही कोथरूडमध्ये सदनिका घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोथरूडमध्ये 1984 मध्ये 250 ते 300 रुपये चौरस फूट, 1989 मध्ये 500 ते एक हजार रुपये चौरस फूट, 1994 ते 97 मध्ये बाराशे ते पंधराशे रुपये चौरस फूट, 2000 ते 2006 मध्ये एक हजार आठशे ते दोन हजार चारशे रुपये चौरस फूट असे सदनिकांचे दर होते. 2008 च्या सुमारास चार ते पाच हजार रुपये चौरस फूट असा दर चालू होता. आजच्या घडीला कोथरूडमध्ये दहा ते पंधरा हजार रुपये चौरस फूट असा सदनिकेचा दर चालू आहे.

जागांच्या वाढलेल्या किमती बांधकामासाठी लागणाऱ्या मालाच्या किमती मध्ये झालेली वाढ यामुळे सदनिकेचे दर दिवसेंदिवस वाढत गेले. पुण्यामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या सुरू झाल्या त्यावेळी त्यामध्ये काम करणाऱ्या मोठ्या पगाराच्या नोकरदार वर्गाला या वाढलेल्या किमतीमध्ये सदनिका घेणे परवडत असल्याने कोथरूडमधील सदनिकांचे दर आणखीच वाढत गेले. कोथरूडचा सर्वांगीण विकास होत असल्याने आणि हवी असलेली प्रत्येक गोष्ट कोथरूडमध्ये उपलब्ध होऊ शकत असल्याने कोथरूडमधील नागरिकांना शहरांमध्ये जाण्याची गरज भासत नाही कोथरूडच्या नियोजन पूर्व विकासामुळे मूलभूत सुविधा पुरवणे सोपे झाले आहे. मुंबईमधील नागरिक व्यावसायिक गुंतवणूक म्हणून कोथरुड मध्ये सदनिका घेणे पसंत करतात.

कचरा डेपो असताना भुसारी कॉलनी परमहंस नगर या भागाचा विकास खुंटला होता मात्र कचरा डेपो गेल्यानंतर या भागाचाही झपाट्याने विकास झाला भुसारी कॉलनी परिसरामध्ये पाण्याचा प्रश्‍न होता तोपर्यंत त्या ठिकाणचे सदनिकांचे दर कमी होते परंतु हा प्रश्‍न सुटल्यानंतर येथील सदनिकांचे भावही गगनाला भिडले. दर वाढले असले तरी सदनिका घेणाऱ्यांची आजही संख्या जास्त आहे. त्यातच पूर्वीच्या जुन्या इमारती पाडून नवीन बांधकामे सुरू झाली आहेत बंगले पाडून इमारती उभ्या राहू लागल्या आहेत.

कोथरूडमध्ये आजही सदनिका घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या भागातील सदनिकांचे दर पाहता या भागात घर घेणे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍या बाहेर गेले आहे. नवीन इमारती बांधण्यासाठी या भागात कमी जागा उरल्या असल्याने आता जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी पुनर्विकासाचे प्रकल्प जोरात सुरू असल्याचे पहायला मिळते. शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक कोथरुडमध्ये पुनर्विकास प्रकल्प उभा करण्यात आघाडीवर असल्याचे दिसतात. त्यात बढेकर डेव्हलपर्स, रावेतकर हाऊसिंग, गोखले कन्स्ट्रक्‍शन यांचा समावेश होतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.