पालखी सोहळ्यांमुळे वाहतूक मार्गात बदल

लोणी काळभोर – पुण्यनगरीतील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारी (दि. 28) संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर (ता. हवेली) येथे आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा सासवड (ता. पुरंदर) येथे मुक्कामासाठी येत आहे.

या दोन्ही पालखी सोहळ्यांच्या पार्श्‍वभुमीवर पुणे-सोलापूर महामार्गावरील व पुणे-सासवड राज्यमार्गावरील वाहतूक गुरुवारी (दि.27) मध्यरात्री 12 वाजल्यापासून पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार आहे. सर्व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक चौफुला न्हावरा मार्गे नगर रोड, पुणे अशी तर सोलापूर बाजूकडे जाणारी वाहतूक येरवडा, मुंढवा, नगर रस्त्याने चौफुला मार्गे सोलापूर अशी वळविण्यात येणार आहे.श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा पुणे-सासवड राज्यमार्गावरून सासवड मुक्कामाकडे प्रस्थान करेल, त्यावेळी या राज्यमार्गावरील वाहने सासवड, चांबळी मार्गे बोपदेव घाट, कोंढवा, पुणे अशी तर सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी मुंढवा मार्गे नगररोड तेथून केडगांव-चौफूला मार्गे सोलापूरकडे जावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.