पुणे – विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत पुरंदर तालुक्यात मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीतील जागा वाटपाच्या मुद्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्याने शांतता दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर मतांची गोळाबेरीज साधण्याकरिता विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस सरसावली असताना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा लढविण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची छुपी युती झाली तर पुरंदरमध्ये ऐन निवडणुकीच्या काळात राजकीय ठोकताळे बदलण्याची शक्यता आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघात अद्याप तरी शांतात आहे. शिवसेनेचा उमेदवार ठरलेला असल्याने सेनेकडून प्रचार सुरू झाला आहे. तर कॉंग्रेस कडूनही अंतर्गत प्रचार सुरू आहे. या स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मात्र हाताची घडी, तोंडावर बोट.., अशा स्थितीत आहेत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षात अद्याप जागा वाटपाची चर्चा झालेली नसल्याने पुरंदरमध्ये आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. त्यातच राष्ट्रवादीतून आऊट गोईंग सुरू असल्याने येथील अनेक इच्छुकांनी तयारीच केलेली नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मुलाखती घेतल्या तेंव्हा इच्छुकांची यादी मोठी होती. परंतु, गेल्या काही दिवसांतील घडमोडीनंतर या यादीतील अनेक नावे आतापर्यंत गळाली आहेत. त्यातही जागा वाटपावर अद्यापही काहीच हालचाली नसल्याने यावेळी आघाडी तुटणार की टिकणार…, यावर सर्व काही अवलंबून असल्याने पुरंदरमध्ये सर्व काही तळ्यात-मळ्यात अशीच स्थिती आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची सध्याची पडझड पाहता, जिल्ह्यातील मतदार संघ ताब्यात ठेवण्याकरीता पक्षाची धडपड सुरू झाली आहे. मतांची गोळाबेरीज साधण्याकरिता चाचपणी सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेण्याचाही प्रयत्न असल्याची कुजबूज तालुक्यात आहे. लोकसभा मनसेने लढविली नव्हती. मात्र, विधानसभेची घोषणा राज ठाकरे यांनी केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुरंदर तालुक्यात उमेदवार दिला जावू शकतो. परंतु, अशावेळी राष्ट्रवादीला मदत करायची की स्वतंत्र उमेदवार द्यायचा, असे कोडे मनसेपुढे असणार आहे. याच कारणातून तालुक्यातील हक्काची मते मिळवण्याकरीता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रयत्न करीत आहेत.
पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, तरीही शहरावर कॉंग्रेसचे वर्चस्व आणि तालुक्याचा आमदार शिवसेनेचा आहे, अशा राजकीय स्थितीत मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मते घेण्याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तयारी सुरू असतानाच राज ठाकरे यांच्या विधानसभा घोषणेनंतर मनसेचे नेते बाबा जाधवराव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उभारी घेतली आहे. पक्षाकडून आदेश आला तरी पुरंदरमधून उभा राहील असेही जाधवराव यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पुरंदरमध्ये मनसेच्या भूमिकेचे महत्त्व
वाढले आहे.
हवेलीतील मतदान कलाटणी देणारे…
पुरंदर विधानसभा मतदार संघाला हवेलीतील 16 गावे जोडण्यात आलेली आहेत. पुरंदरमध्ये गेल्यावेळी विधानसभेकरिता साधारणपणे 2 लाख 61 हजार 816 मतदार होते. यावेळी मतदारांची संख्या 31 हजार 776 पेक्षा अधिक वाढली आहे. यामध्ये हवेलीतील मतदारांची संख्या किमान 22 ते 25 हजार आहे. पुरंदमध्ये मतांची विभागणी झाल्यास पूर्व हवेलीतील मतांची आघाडी मिळू शकते, ही आकडेवारी लक्षात घेता पुरंदर विधानसभा मतदार संघात हवेलीतील गावांतून होणारे मतदार कलाटणी देणारे ठरणार आहे.