माफियागिरीमुळे उद्योजक हैराण

अजित पवार यांची टीका : माथाडी, भंगार माफियांचा उच्छाद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या औद्योगिक पट्ट्यातील उद्योजक सत्ताधाऱ्यांच्या माफियागिरीमुळे हैराण झाले आहेत. गेल्या पाच वर्षांत याठिकाणी एकही नवा उद्योग आलेला नसून आहेत ते उद्योजक थांबायला तयार नाहीत. पूर्वी वाळू, लॅंण्ड माफीया होते आता नव्यानेच तयार झालेल्या माथाडी माफिया आणि भंगार माफियांनी उच्छाद मांडल्याने कायदा व सुव्यस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

सांगवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, अजित गव्हाणे, मंगला कदम, राजू मिसाळ, जावेद शेख यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, शहर असुरक्षित बनले आहे. औद्योगिक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांच्याच काही लोकांची दहशत सुरू आहे.

इतरांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुंडगिरी, दहशतीला आळा घालण्यात अपयश आले आहे. भाजपाच्याच नगरसेविकेला जिवे मारण्याचा प्रयत्न होतो, ही बाबच चिंतेची आहे. भंगाराचा ठेका देण्यासाठी उद्योजकांना दमदाटी होते, त्यांनाच ठेका मिळावा यासाठी आता मंत्रालयातून फोन येतो, ही बाब धक्कादायक आहे.
दिलीप मोहिते यांच्या पाठीशी विरोधकांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी चालविला आहे. मराठा आंदोलनात जाणीवपूर्वक दिलीप मोहिते यांच्यावर गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. त्यांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसून पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहे, असेही ते म्हणाले.

नाऊमेद होऊ नका!
लोकसभा निवडणुकीत आपल्याला अपयश आले असले तरी खचून जाण्याचे काहीच कारण नाही. एका व्यक्तीकडे बघून लोकांनी मतदान केले आहे. विधानसभेची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या उमेदवारांनाही चांगली मते मिळाली आहेत. आपल्याच विचारसरणीचे इतर पक्षाचे उमेदवार उभे राहिल्याने 10 ते 12 जागा हातच्या गेल्या. विधानसभेत काहीही करून 145 आकडा गाठायचा असल्याने लोकसभेतील पराभव विसरून कामाला लागा. जनतेला विश्‍वास दिल्यास परिस्थिती नक्कीच बदलेल, या शब्दांद्वारक पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
“बेस्ट सिटी’ची “वेस्ट सिटी’ केली
आमच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेस्ट सिटीचा ऍवॉर्ड जिंकला होता. भाजपाची सत्ता आल्यापासून या शहराची वाटचाल वेस्ट सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे. शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर असून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे हे द्योतक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)