जामखेड : ग्रामिण भागातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळविण्यासाठी मंजुर झालेल्या जामखेड येथील क्रीडा संकुलाचे आणि बॅडमिंटन ‘हॉल’चे काम पुन्हा नीधी अभावी रखडले आहे. त्यामुळे सदरचे काम त्वरित चालू करावे अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने मंगळवार पासुन अमरण उपोषणास बसण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळविण्यासाठी तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शासनाने २००३ मध्ये सोयीसुविधांसाठी २५ लाख रुपयांचा निधी जिल्ह्तील क्रीडा संकुलांना दिला होता. त्यानंतर २००९ मध्ये हा निधी एक कोटी रुपये करण्यात आला होता. त्या अनुशंगाने जामखेड येथील भुतवडा रोड जवळील पाण्याच्या टाकी शेजारील असलेल्या क्रीडा संकुलाला शासनाच्या वतीने सन २०११-१२ साली म्हणजे आठ वर्षांपूर्वी १ कोटीं रूपयांचा निधी मंजूर झाला होता.
मात्र संबधीत ठेकेदाराकडुन येथील कामांच्या नीधीसंबधी भाववाढ करण्यात यावी या कारणावरून सदरचे काम बंद पडले. त्यावेळी एक कोटी मधिल चारशे मिटरचा प्लॉट व वॉलकंपाऊंड असे ३५ लाख रुपयांची कामे करण्यात आली होती व ६५ लाख रुपयांची कामे शिल्लक राहिली होती. मागिल दोन वर्षापूर्वी जामखेड येथे क्रीडा प्रेमी व सुर्योदय ग्रृप च्या वतीने क्रीडा संकुलाचे काम सुरू व्हावे अशी मागणी लावुन धरल्या नंतर या ठिकाणी बॅडमिंटन टेबल टेनिस हॉल च्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली होती.
या मध्ये बेसमेंट व विटांच्या भिंती पर्यंत चे काम सुरू झाले होते. मात्र पुन्हा हे काम निधी अभावी रखडले. क्रीडा संकुलाचे व बॅडमिंटन हॉल चे रखडलेले काम तातडीने सुरू करावे अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे.
काम न झाल्यास मंगळवारपासून अमरण उपोषणास बसण्याचा इशारा ‘जामखेड’चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, कार्याध्यक्ष भिमराव पाटील, गणेश हगवणे, राहुल पवार व सुर्योदय ग्रुपच्या सदस्यांनी निवेदन दिला आहे.